नंदुरबार। महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचे संस्थापक तसेच महाराष्ट्रातील एक अग्रणी समाजसुधारक डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला चार वर्षे पूर्ण झाली असून अद्यापही त्यांचे मारेकरी व त्यामागील सूत्रधार सापडले नाहीत. तपासतील या दिरंगाईचा निषेध करत फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी अंनिसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवाब दो धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील अंनिसच्या शहादा, तळोदा, नंदुरबार,नवापूर, प्रकाशा, विसरवाडी, परिवर्धा, आदी शाखांचे व जिल्ह्यातील पुरोगामी व परिवर्तनवादी, संस्था संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.
अंनिसची स्फूर्तीगिते सादर
सुरुवातीला अंनिसच्या कार्यकर्त्यांनी चळवळीतील स्फूर्तिगीते सादर केली. राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी डॉ दाभोलकरांच्या खुनाची पाश्वभूमी व तपासतील सद्यस्थिती, दिरंगाई व शासनाची व तसेच तपास यंत्रणेची निष्क्रियता याविषयी कार्यकर्त्यांना माहिती दिली. जवाब दो आंदोलनांतर्गत जिल्ह्यातील आमदारांना डॉ दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या खुनाच्या तपासात झालेल्या दिरंगाईचा जाब विचारण्यासाठी निवेदने देण्यात आली.
आरोपींना तात्काळ अटक करा
निवासी जिल्हाधिकारी अनिल पवार यांना खुनाच्या तपासतील दिरंगाईचा निषेध व्यक्त करणारे व फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबतचे राज्यपालांच्या नावे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रधान सचिव खंडू घोडे, सहसचिव हंसराज महाले, महिला विभाग कार्यवाह भारती पवार, प्रा प्रशांत बोबडे, सरपंच मंगलसिंग पाटील, प्रा मुरलीधर उदावंत, प्रा हणमंत सरतापे, रवींद्र पाटील, संतोष महाजन, आरिफ मणियार, सुभाष भुजबळ, राहुल रामराजे, अनंत सूर्यवंशी, मनोहर गवळे, निर्मल माळी, आदी करकर्त्यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
आंदोलनात जेष्ठांचा सहभाग
सोशल मीडियावर राबवण्यात आलेल्या आंदोलनाची माहिती देण्यात आली. दरम्यान ,धरणे आंदोलनात ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा.पितांबर सरोदे, अंनिस जिल्हा अध्यक्ष, डॉ अर्जुन लालचंदनी उपाध्यक्ष डॉ. डी. बी. शेंडे, संभु पाटील, राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा संघटक मोहन पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अॅड. गोविंद पाटील, विचारधारा फाउंडेशनचे तात्याजी पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. फुले, शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर म्हणत काम अखंडित चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.