नंदुरबार येथे आण्णासाहेब पाटील महामंडळ समन्वयकाला लाच घेतांना अटक !

0

नंदूरबार: जिल्हाधिकारी कार्यालयातील आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या जिल्हा समन्वयकाला तीन हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरची कारवाई केली आहे. करण्यात आलेल्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांनी अण्णाभाऊ पाटील महामंडळ कौशल्य विकास विभागातून शासकीय योजने अंतर्गत महिंद्रा पिकअप वाहन खरेदी केले होते. त्यावरील व्याज शासन दरमहा तक्रारदारांच्या बँक अकाउंटमध्ये ऑनलाइन जमा करते.

व्याजाची थकीत २ महिन्याची रक्कम मंजूर करून तक्रारदारांच्या अकाउंटला जमा करावी. यासाठी लोकसेवक जिल्हा समनव्यक योगेश चौधरी यांनी मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत पंच व साक्षीदार यांच्या समक्ष लाचेची रक्कम स्वीकारताना योगेश चौधरी यांना रंगेहाथ पकडले.

जिल्हाधिकारी कार्यालयातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरिष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल अहिरराव, हवालदार महाजन, गुमाणे, चित्ते, मराठे, नावाडेकर, अहिरे, बोरसे, ज्योती पाटील या पथकाने कारवाई केली.