रवींद्र चव्हाण नंदुरबार- लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या उमेदवार खासदार हिना गावित व काँग्रेसचे उमेदवार आमदार के.सी. पाडवी या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर पक्षाअंतर्गत नेत्यांमध्ये असलेल्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. वेगवेगळ्या कारणामुळे रुसून बसलेल्या अशा नेत्यांची मनधरणी या उमेदवारांना करावी लागत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पक्षात सुरुवातीपासूनच गटबाजीचे चित्र पहावयास मिळत आहे. वेगवेगळ्या सभा बैठकांमध्ये पक्षांतर्गत असलेली गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे चित्र अनेकदा पाहिले आहे. याचा फायदा घेत काँग्रेसच्या नेत्यांनी नंदुरबार जिल्ह्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बाजी मारली आहे. खासदार डॉ. हिना गावित व शहादा मतदार संघाचे आमदार उदेसिंग पाडवी हे एकाच पक्षातील म्हणजे भाजपाचे लोकप्रतिनिधी असताना त्यांचे एकमेकांचे कधीच जमले नाही. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी केल्याच्या गंभीर तक्रारी थेट वरिष्ठ पातळीवर केल्या आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार तथा भाजपाच्या जिल्हाअध्यक्ष डॉ. हिना गावित यांचे एकमेव नाव उमेदवारीसाठी पक्षपातळीवर पाठविण्यात आले होते. त्यामुळे भाजपाच्या पहिल्याच यादीत खासदार हिना गावित यांचे नाव भाजपाच्या उमेदवार म्हणून जाहीर झाले. मात्र पक्षांतर्गत असलेल्या नाराजीने खासदार हिना गावित त्रस्त राहील्याने एक पाऊल पुढे टाकत खासदार हिना गावित यांनी आमदार उदेसिंग पाडवी यांची भेट घेऊन मनधरणीचा प्रयत्न केला आहे. मतभेद विसरून एकत्रित काम करण्याचं आश्वासन आमदार उदेसिंग पाडवी यांनी खासदार हिना गावित यांना दिले. गेल्या चार वर्षापासून एकाच पक्षात लोकप्रतिनिधी म्हणून वावरणारे आणि नेहमी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे खासदार हिना गावित व आमदार उदेसिंग पाडवी यांची युती किती मजबूत राहते हे येणार्या काळात दिसणार आहे. दरम्यान काँग्रेसच्या गटात देखील काहीसे असेच वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ आमदार के.सी. पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी व जेष्ठ खासदार माणिकराव गावित यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावित यांची नावे होती. त्यापैकी के. सी.पाडवी यांचे नाव मात्र आघाडीवर होते. शस्त्रक्रियेला चेन्नई येथे जाण्यापूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेचे सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी लोकसभा निवडणुकीची रणनिती आखुन ठेवली होती. कुणीही एकमेकांच्या विरोधात भूमिका न घेता एकत्र येऊन भाजपाला टक्कर देणे गरजेचे आहे. अन्यथा एकमेकांवर कुरघोड्या केल्या तर राजकारणातून संपुन जाणार असा इशारा देखील देण्यात आला होता. असे असताना भरत गावीत यांच्यासाठी माजी गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांनी दिल्ली गाठून ठाण मांडले होते. परंतु पक्षाने शेवटी के.सी. पाडवी यांनाच तिकीट जाहीर केल्याने माणिकराव गावित यांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे माणिकराव गावित हे देखील अंतर्गत नाराज असून त्यांची मनधरणी पाडवी यांना करावी लागणार आहे. एकंदरीतच लोकसभा निवडणुकीतील दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांना पक्षांतर्गत असलेल्या नाराजीचा सावटाने पछाडलं आहे.
Prev Post