नंदुरबार शहराच्या विकासकामांचे आचारसंहितेपूर्वी करणार उद्घाटन

0

नंदुरबार। स्मार्ट सीटीला साजेल अशी विकासकामे नियोजनाप्रमाणे नंदुरबार शहरात करण्यात आहेत. नगरपालिका निवडणूकीची आचार संहिता लागण्यापुर्वीच विकास कामांचा शुभारंभ नेते, सिनेअभिनेते यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 13 ऑगस्ट रोजी विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखेपाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे नेते आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवाजी नाट्य मंदिरात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आ. रघुवंशी म्हणाले की, नंदुरबार शहर स्मार्टच्या दिशेने नेण्यासाठी नियोजनबध्द विकासकामे करण्यात आली आहेत. शहरातील चौक, प्रवेशव्दार, उद्याने, रस्ते आदी कामे करण्यात आली असून या कामांमुळे शहराच्या सौदर्यात भर पडली आहे. गरीबांना अल्पदरात आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात म्हणून आरोग्य सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. याच दिवशी सकाळी 11.30 वा. शिवाजी नाट्य मंदिर शेजारी सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत शिलाई मशिन व ब्युटी पार्लर साहित्याचे वापट होणार आहे.

गरीबांसाठी निवारा उभारणार
शहरातील स्व.विलासराव देशमुख ट्रक टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात असून सप्टेंबर मध्ये त्याचा शुभारंभही आ. अमित देशमुख सिने अभिनेते रितेश देशमुख, उल्हासदादा पवार यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. बहुतांश विकासकामे पुर्ण झाली असून काही प्रगती पथावर आहेत. अशा कामांचा शुभारंभही निवडणूक आचार संहिता लागण्यापुर्वी करण्याचा प्रयत्न असल्याचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. नंदुरबार शहरात रस्त्यावर फिरुन रात्री कुठेही झोपणार्‍या गरीब लोकांचा सर्वे नगर पालिकेने केला असून असे 30 लोक आढळून आले आहेत. त्यांच्या निवासाची व जेवणाची सोय नगर पालिकेच्या माध्यमातून करण्याचा मानस आहे. त्यासाठी साक्रीनाका परिसरात निवार्‍याची व्यवस्था उभारली जाणार असून रात्रीची जेवणाची सोय देखील केली जाणार आहे. अशीही माहिती आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.