मुंबई । नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहे. सुट्टे, पत्ते, मटका, दारू विक्री सर्रासपणे सुरू असून, शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने हे अवैध धंदे सुरू असल्याचे सांगण्यात येत असल्याने आयजी व पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल या बैठकीला सर्व आमदारांना बोलावण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.विधानपरिषदेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार शहरातील अवैध धंदे वाढत असल्याबद्दल लक्षवेधी उपस्थित केली. त्यास उत्तर देताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर बोलत होते.
नंदुरबारला होणार्या बैठकीस मी स्वतः उपस्थित राहणार आहे, बैठकीत अवैध धंद्याला लगाम लावण्याविषयी सूचना देण्यात येईल तसेच दोषी आढळणार्या पोलीस अधिकार्यावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. नंदुरबार शहरातील अवैध धंदे बंद झाल्यास जवळपास 90 टक्के प्रश्न सुटतील, असा विश्वास आमदार रघुवंशी यांनी व्यक्त केला. शहरातून वर्षभरात 150 मोटारसायकल चोरीस गेली आहे. जशी मुंबईला फॅशन स्ट्रीट आहे तसे नंदुरबारला अवैध धंद्याचे स्ट्रीट असल्याचे आमदार रघुवंशी यांनी सांगितले. बैठकीत सगळे पुरावे देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बाजारात शेती उत्पादन विक्रीस घेऊन जात असतांना रस्त्यात त्यांना लुटले जाते. यावर निर्बंध लादण्याची मागणी आमदार रघुवंशी यांनी केली.