नंदुरबार, शहाद्यात वॉटरकप

0

मुंबई । पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते 2018 च्या वॉटर कप स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून यंदा या स्पर्धेत सहभगासाठी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा तालुका पात्र ठरले आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून या दोनही तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे होणार आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अभिनेता आमिर खान यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्रात मोठे परिवर्तन घडविणारे काम होत आहे. वॉटर कप व जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 2019 पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. स्पर्धेसाठी राज्य सरकार सर्व सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

31 जानेवारी अंतिम मुदत
ग्रामसभा घेऊन ‘पानी फाऊंडेशन’तर्फे घेतल्या जाणार्‍या चार दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाच प्रशिक्षणार्थीची निवड करायची आहे. दुसर्‍या भागाची प्रवेशिका पूर्ण करुन पाठवण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2018 आहे. निवडलेल्या तालुक्यांतील सर्व गावांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन ‘पानी फाऊंडेशन’तर्फे करण्यात आले आहे.

विजेत्या गावांना 75 लाख
स्पर्धेचा कालावधी 8 एप्रिल ते 22 मे 2018 आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे 75 लाख रुपये, 50 लाख रुपये व 40 लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाईल. त्याखेरीज स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे.

खानदेशातील सहा तालुके
राज्यात 2016 आणि 2017 हे दोन वर्ष भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘पानी फाऊंडेशन’च्या वतीने अभिनेता आमिर खान व किरण राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिसरी ‘सत्यमेव जयते वॉटर कप 2018’ स्पर्धा जाहीर केली. यावेळी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, रिलायन्स फाऊंडेशनचे प्रमुख तथा उद्योजक मुकेश अंबानी, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक, शांतिलाल मुथ्था आदी उपस्थित होते. खान्देशातील नंदुरबार, शहादा यासह जळगावातील अमळनेर, पारोळा व धुळ्यातील धुळे व शिंदखेडा या तालुक्यांचा समावेश आहे.