नंदूरबार आरटीओ कार्यालयाचा भोंगळ कारभार

0

नंदुरबार । येथील आरटीओ कार्यालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभारामुळे वाहनधारक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वेळेवर अधिकार्‍यांची उपस्थिती नसणे जनरेटर बंद असणे यासारख्या अनेक कारणांमुळे वाहन नोंदणीसाठी आलेल्या ग्रामिण भागातील नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नंदुरबार या जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय विविध प्रकाराने बहुचर्चित राहिले आहे. या ठिकाणी दलालांचाच अधिक सुळसुळाट वाढल्याने त्याचा भुर्दंड सर्वसामान्य वाहनधारकांना बसत आहे. वाहन नोंदणीची प्रक्रिया कधीही बंद पडते व कधीही सुरू असते याचा भरवा राहत नाही. संबंधित अधिकारी देखील वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे नागरिकांना भर उन्हात ताटकळत दिवसभर उभे रहावे लागते.

वीज पुरवठा नसल्याने अनेक कामे रखडली
या कार्यालयात जनरेटर बसविण्यात आले आहे, पण ते देखील बंद अवस्थेत राहते. त्याचा परिणाम कामकाजावर होत असतो, या बाबींचा विचार करून आरटीओ कार्यालयाच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणे गरजेचे आहे. दरम्यान नोटाबंदीसारखी परिस्थिती बी.एस.3 ची वाहने बंद केल्यानंतर येथे पाहायला मिळाली. पर्यावरणाला बाधा ठरणारी अशी वाहने बंद करण्यात आल्यानंतर तीच वाहने विविध कंपन्यांनी सवलतीच्या दरात विक्री करायला सुरूवात केली होती. या दरम्यान दीड हजाराहून अधि टू-व्हीलर वाहनांची विक्री झाली. त्यापैकी 1264 वाहनांची नोंदणी आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. 25 ते 31 मार्च या पाच दिवसाच्या कालावधतीच नवीन वाहने नोंदणीच्या माध्यमातून शासनाला 1 कोटी 87 लाख, 16 हजार रूपयाच्या महसुल मिळाला आहे. अजूनही अनेक वाहनांची नोंदणी करावयाची बाकी असून वाहन फोर हे नवीन सॉफ्टवेअर बसविल्यानंतर त्यांची नोंदणी केली जाणार आहे. ही प्रक्रिया 17 एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे आर.टी.ओ.कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.