नंदुरबार । शहरातील दंगल प्रकरणी पोलीसात दोन्ही गटातील 100 हुन अधिक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 25 ते 30 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या भागात सोमवार 12 जून रोजी लोकप्रतिनिधींनी भेट देऊन पाहणी केली. वैयक्तिक वादामुळे शहरात शास्त्री मार्केट, सुभाष चौक, मंगळबाजार, भाजीमंडई, मन्यार मोहल्ला, सोनार खुंट या भागात शनिवारी 10 जून रोजी दगडफेक व जाळपोळ करण्यात आली होती. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करुन अवघ्या तासाभरात दंगल नियंत्रणात आणली या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता होती. या पार्श्वभुमीवर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी घटनास्थळांची पाहणी केली.
मृत पिंजारी यांच्या निवासस्थानी भेट देवून केले सांत्वन
यावेळी सोबत माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम शासकीय निवासस्थानी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेवून शास्त्री मार्केट आणि मन्यार मोहल्ला या भागांना भेटी देवून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर मृत शब्बीर शेख मासूम पिंजारी यांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांच्या कुटूंबियांचे सात्वन केले. पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी फिर्याद दिली असून 100 हुन अधिक लोकां विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे,. अजूनही धर पकड सुरू असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.