मोहाली । रोहित शर्माला 23 जानेवारी 2013मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात प्रायोगिक तत्वावर सलामीवीर म्हणून पाठवण्यात आले होते. मात्र, त्यावेळी कोणाच्याही असे ध्यानीमनी नव्हते की मुंबईचा हा सलामीवीर पुढे जाऊन क्रिकेटमधील इतके रेकॉर्ड तोडेल. रोहितची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील सर्वोच्च धावसंख्या 264 आहे. श्रीलंकेविरुद्ध 2014मध्ये त्याने ही धावसंख्या उभारली होती. यााशिवाय 2013मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकातामध्ये 209 धावा ठोकल्या होत्या. सामना संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मार्गदर्शक रवि शास्त्री यांनी रोहितला विचारले, तीन द्विशतकांमधील या द्विशतकाला काय रेटींग देशील ? त्यावर रोहित म्हणाला की, कोणते एक द्विशतक चांगले हे सांगणे माझ्यासाठी कठीण असेल.तिन्ही द्विशतकांचे महत्त्व माझ्यासाठी खास आहे. कठीण वेळात मी द्विशतक ठोकले आहे, असे उत्तर रोहितने दिले.
टायमिंगवर विश्वास
देशातील सर्वात मोठ्या मैदानापैकी हे एक आहे, जिथे प्रत्येक कोपर्यात तू शॉट मारलास ? असा प्रश्न रवी शास्त्रींनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना रोहित म्हणाला की, याचे श्रेय भारतीय संघाचे ट्रेनर शंकर बासु यांना जाते, ते आमच्यासोबत खूप मेहनत घेत आहेत. चेंडूला वेळ देऊन खेळण ही माझी ताकद आहे. मी त्यावरच फोकस केल. मला माहितेय मी एम. एस. धोनी किंवा ख्रिस गेल नाही की माझ्याकडे एवढी पॉवर असेल.पण मी टायमिंगवर विश्वास ठेवतो, जो या सामन्यामध्ये ठेवला,असे उत्तर रोहितने दिले. शंकर बासू यांनी सरावाच्यावेळी चेंडू बॅटीवर येईपर्यंत कसा अंदाज घ्यायचा याचे मार्गदर्शन केले होते. त्यात बदलत्या वातावरणाचा चेंडूवर कसा परिणाम होतो. त्यामुळे चेंडू कमी जास्त वेगाने कसा येतो याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले होते. आता त्याच पद्धतीने खेळताना धावांचा ओघ वाढल्याचे रोहीत म्हणाला.
सलामीवीर म्हणून भूमिका बजावण्याआधी रोहितने 86 सामन्यांत 30.43 च्या सरासरीने केवळ 1978 धावा केल्या होत्या. मात्र, जसा तो सलामीवीर म्हणून मैदानात उतरला त्यानंतर रोहितच्या बॅटमधून धावांची टांकसाळच उघडली. त्याच्या नावावर तर आता एकदिवसीय सामन्यात तिसर्यांदा दुहेरी शतक ठोकण्याचा पराक्रम नोंदवला गेलाय.
89 सामन्यांत 4450 धावा
रोहित शर्माने सलामीवीर म्हणून 89 सामन्यांमध्ये 56.32 च्या सरासरीने 4450 धावा केल्यात. यात 14 शतके आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. सलामीवीर होण्याआधी रोहितच्या नावावर 86 सामन्यांत केवळ दोन शतके आणि 12 अर्धशतके होती. त्याची सर्वोच्च धावसंख्या 114 होती. सलामीवीर म्हणून भूमिका बजावताना रोहितची सर्वोच्च धावसंख्या 264 इतकी आहे. 2014मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ही खेळी केली होती. रोहितने 23 जानेवारी 2013 नंतर 86 सामन्यांत सलामीची भूमिका बजावली. यात त्याने 57.42 च्या सरासरीने 4421 धावा केल्या. यादरम्यान, केवळ एकदाच अफगाणिस्तानविरुद्ध 2014मध्ये ढाकामध्ये तो तिसर्या क्रमांकावर खेळण्यास उतरला होता. या सामन्यात त्याने 18 धावा केल्या होत्या.