पेसा अंतर्गंत निधीचा वापर करणार
शहादा : तालुक्यातील नऊ गावांना विंधन विहिरी अधिग्रहण केल्या आहे. तालुक्यात काही गावांना भीषण पाणीटंचाई असून विंधन विहीर, कूपनलिका करण्यासाठी पेसा अंतर्गंत निधीचा वापर करण्यात येणार आहे. टंचाईग्रस्त तालुका असला तरी शहादा तालुका टँकर मुक्त असल्याचे प्रतिपादन शहाद्याचे तहसीलदार मनोज खैरनार यांनी पाणीटंचाई आढावा बैठकीत व्यक्त केले.
शहादा पंचायत समितीचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात तालुका पाणीटंचाईची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला तहसीलदार मनोज खैरनार, गटविकास अधिकारी श्रीराम कागणेे, पाणीपुरवठा उपअभियंता मराठे यांच्यासह ग्रामसेवक विस्तार अधिकारी, तलाठी सर्कल उपस्थित होते.
शहादा तालुक्यात सुमारे सव्वाशे खेडी, पाडे आहेत. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. कूपनलिका बंद झाल्यामुळे खासगी विंधन विहिरी, कूपनलिका येथून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामीण भागातील बुधगाव, बोरटे या तीन गावांना तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्याचे आढावा बैठकीत सांगण्यात आले. तसेच 23 गावांना विंधन विहीर अधिग्रहण करण्यात आले असून त्यापैकी भुलाणे, टेंभे तशा, बोराळे, आधारे, लोहारा, कलमाडी, पिंपळे, असलोद या नऊ गावांना विंधन विहीर अधिग्रहण केल्याचे सांगण्यात आले.
पाणीटंचाई सोबतच तालुक्यात चाराटंचाईचा प्रश्न आहे. जिल्हाबंदी असल्याने चारा विक्री होत नसल्याचे आढावा बैठकीत म्हटले आहे. ज्या गावात विंधन विहीर, कूपनलिका अधिग्रहण करायचे असेल किंवा विंधन विहिरी तयार खेड्यांवर पेसा अंतर्गत असलेल्या निधीचा वापर करण्याचे गटविकास अधिकारी श्रीराम कागणे यांनी ग्रामसेवक, सरपंच यांना बैठकीत आदेश दिले आहेत. शहादा तालुका टँकर मुक्त असला तरी ग्रामीण भागात पाणीटंचाई असल्याने प्रशासनाला नियोजन करणे गरजेचे आहे. महिन्याभरात पावसाचे आगमन होणार असल्याने प्रशासनाला ग्रामीण भागात पाणीटंचाईवर लक्ष ठेवणे आवश्यक झाले आहे.
Prev Post
Next Post