नऊ गावांमध्ये होईल परिवर्तन

0

नंदूरबार । महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाऊंडेशन (एमव्हीएसटीएफ) या उपक्रमाने राज्याच्या ग्रामीण भागात विकासाला सक्षमता आणि चालना देण्याच्या हेतूने डॉइश बँकेसमवेत नुकताच सामंजस्य करार केला. डॉइश बँकेने नंदुरबार जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायती दत्तक घेतल्या असून यासाठी‘एमव्हीएसटीएफ’ला 10 कोटी रुपये सहाय्य करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्याच्या अर्थसाह्याचा साडेतीन कोटी रुपयांचा धनादेश श्री. गिल यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. बालमृत्यूंचे प्रमाण कमी करणे, शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे तसेच स्वच्छता अभियानामध्ये गावकर्‍यांचा सक्रिय सहभाग वाढवणे हे एमव्हीएसटीएफ’चे मुख्य उद्दिष्ट असेल. सौर ऊर्जेचा वापर करून जिल्ह्यातील शाळा वमहाविद्यालयांना वीज उपलब्ध करून देणे, निंबोणी व वाटवी तालुक्यातील गावातील शाळा,ग्रामपंचायत व सरकारी कार्यालये यांचे संगणकीकरण करणे व मोफत इंटरनेट उपलब्ध करून देणे यांसारखे प्रकल्प जिल्ह्यात सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर हा उपक्रमाकडे लक्ष लागून आहे.

आवास योजनेचे अंमलबजावणी
प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणीही जिल्ह्यात यशस्वीपणे सुरू असून, या योजनेच्या एक हजार छत्तीस लाभार्थ्यांच्या खात्यात पहील्या टप्प्यातील पंचवीस हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. एमव्हीएसटीएफ’ ही देशातील सार्वजनिक-खासगी भागीदारी आहे. ‘एमव्हीएसटीएफ’ युवकांना‘चीफ मिनिस्टर्स रुरल डेव्हलपमेंट फेलोशिप’ (सीएमआरडीएफ) या छात्रवृत्ती कार्यक्रमाच्या रुपाने संधी पुरवते. या फेलोजची ग्राम पंचायतींकडे नियुक्ती होते आणि ते सहभागात्मक विकास योजना तयार करण्यासाठी व त्यांच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक प्रशासनाशी सहकार्याने काम करतात.

अधिकार्‍यांचे मार्गदर्शन
अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांचे मार्गदर्शन व पालकत्वाखाली ‘व्हीएसटीएफ’कार्यरत असून आतापर्यंत राज्यात310 गावांचा या उपक्रमात समावेश झाला आहे. अधिक 300 गावांचा समावेश पुढील टप्प्यात करण्यात येईल. या कार्यक्रमात बोलताना‘एमव्हीएसटीएफ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रमण्यम यांनी गावांतील प्रशासन, सरपंच व ग्रामस्थांकडून‘एमव्हीएसटीएफ’ला मिळत असलेल्या सहकार्याविषयी माहिती दिली. राज्यातील 1000 गावांमध्ये हा परिवर्तन कार्यक्रम राबवण्यासाठीची व्यूहरचना आणि या प्रकल्पाचा सकारात्मक परिणाम त्यांनी ठळकपणे मांडला.

यांची उपस्थिती
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी,डॉइश बँकेचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी रवनीत गिल,व्यवस्थापकीय संचालक आणि इंडिया इक्विटी रिसर्च विभाग प्रमुख अभय लैजाला, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) प्रमुख रुची खेमका,इंडिया इक्विटी रिसर्च संचालक अभिषेक खेमका, ‘एमव्हीएसटीएफ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रमण्यम उपस्थित होते.