वॉशिंग्टन: माझं नाव जॅक डेव्हीस आहे आणि मी ‘नासा’मध्ये ग्रह रक्षक पदासाठी अर्ज करीत आहे. नऊ वर्षाचाच आहे हे खरं आहे पण मला वाटतं मी या पदासाठी एकदम योग्य आहे. माझी बहिण म्हणते मी सर्व अंतराळ फिरलेला परग्रहवासी आहे आणि आकाशगंगेचा पालक आहे… ‘नासा’च्या ग्रह रक्षक पदासाठी जॅकने अर्ज केलाय. त्यात असा मजकूर आहे. ‘नासा’नेही चौथीतल्या लहान पोराचं काय ऐकायचं असा दृष्टीकोन न ठेवता उत्तर दिलंय. वैज्ञानिक आईनस्टाईनलाही गणित चांगलं येतं म्हणून एका आईने शाळेतल्या मुलीची शिकवणी घ्यायला लावली होती. ते काम त्याने कोणताही अहंकार न ठेवता चोख बजावलंही होतं. तसंच प्रोत्साहन ‘नासा’नेही लहान पोराला दिलंय.
‘नासा’चे अंतराळशास्त्रज्ञ संचालक जिम ग्रीन जॅकला उत्तर दिलेल्या पत्रात म्हणतात, मी ऐकलंय की तू आकाश गंगेचा पालक आहेस. तुला ‘नासा’त ग्रह रक्षक अधिकारी पदासाठी अर्ज करावासा वाटला, हे खूपच छान आहे. तुला माहित आहे का, सूर्यमालिकेतील ग्रहांचे पृथ्वीकडून आणि पृथ्वीचे अन्य ग्रहांकडून सूक्ष्म जीवापासून रक्षण करण्यास हा अधिकारी जबाबदार असणार आहे. आपल्या अंतराळ मोहिमांवर जीवाणू न पसरविण्याची जबाबदारी असणार आहे. हे काम अधिकाऱ्याच्या अखत्यारित येते.
‘नासा’ला हुशार वैज्ञानिक आणि इंजिनीयर हवे असतात. तुला माझं सांगणं आहे, की तू शाळेत मन लावून अभ्यास कर आणि मोठा झाल्यावर ‘नासा’त ये. तू येथे आलास तर आम्हाला आनंदच होईल, असे उत्तर ग्रीन यांनी जॅकला दिले आहे. इतकचं नाही तर त्याला फोन करूनही ‘नासा’ने त्याचे अभिनंदन केले आहे.
‘नासा’ने ग्रह संरक्षक अधिकारी पदासाठी जाहिरात दिलेली आहे. १४ ऑगस्ट ही अर्ज करण्याची अंतिम मुदत असून या पदासाठी घसघशीत पगारही आहे.