नऊ सराईत गुन्हेगारांकडून तब्बल 14 लाखांचा ऐवज जप्त

0

पिंपरी पोलिसांची कारवाई; 15 गुन्हे उघडकीस

पिंपरी : मागील काही दिवसांपासून शहरात मोबाईल चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, सोने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याबाबत पिंपरी पोलिसांनी कारवाई करत नऊ सराईत आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून 14 लाख 7 हजार 725 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील 15 गुन्हे उघडकीस आले आहेत. सात कारवायांमध्ये 15 गुन्हे उघड झाल्याने शहरातील गुन्हेगारांवर पोलिसी खाक्याचा वचक निर्माण झाला आहे.

सुरजितसिंग राजपालसिंग टाक (रा. हडपसर), हर्षल गुलाब पवार (रा. मुळशी), महेश शिवदास दिक्से (रा. वाशीम), सॅम्युअल उर्फ विशाल डेडली ऑरनॉल्ड (रा. पिंपरी), अतुल अविनाश पवार (वय 25, रा. पिंपरी), सागर कुमार इंद्रा (रा. काळेवाडी), राहुल श्रीहरी काळे (रा. बुधवार पेठ), अक्षय आबासाहेब कोळेकर (रा. चिखली), शुभम नितीन काळभोर (रा. चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांना माहिती मिळाली
बुधवार (दि. 9) रोजी क्षेत्रवन अपार्टमेंटमध्ये काही इसम घुसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अपार्टमेंटमध्ये प्रवेश केलेले इसम घरफोडी करण्याच्या तयारीत असल्याचे समजताच पिंपरी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून सुरजितसिंग याला ताब्यात घेतले. अन्य तिघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. सुरजितसिंगकडे कसून चौकशी केली असता पिंपरी पोलीस ठाण्यातील पाच, हडपसर पोलीस ठाण्यातील एक आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले. त्याच्याकडून तीन लाख 50 हजार रुपये किमतीच्या दोन सॅन्ट्रो कार, 79 हजार 225 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि 15 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण चार लाख 44 हजार 225 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रविवार (दि. 20) रोजी सराईत गुन्हेगार हर्षल पवार याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन लाख 46 हजार 800 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. गुरुवार (दि. 24) रोजी मिलिंदनगर पिंपरी येथे तिघेजण स्विफ्ट डिझायर (एम एच 12 / पी क्यू 6201) कारमधून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सॅम्युअल, अतुल आणि सागर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस, एक लोखंडी कोयता, एक सुरा व एक स्विफ्ट डिझायर असा एकूण तीन लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

पिंपरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत 11 तोळे 3 ग्रॅम सोने-चांदीचे दागिने 23 मोबाईल फोन, 3 देशी बनावटीचे पिस्टल, 3 जिवंत काडतुसे, 2 सेन्ट्रो कार, 1 स्विफ्ट कार, 1 करिझ्मा मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण 14 लाख 7 हजार 725 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक निरीक्षक सतीश पाटील, वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव, निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, विठ्ठल बढे, हरिदास बोचरे, महिला उपनिरीक्षक रत्नमाला सावंत, सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय ननवरे, हवालदार शाकीर जिनेडी, राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, पोलीस नाईक महादेव जावळे, जावेद पठाण, श्रीकांत जाधव, संतोष दिघे, प्रवीण वाजे, पोलीस शिपाई दादा धस, निलेश भागवत, उमेश वानखेडे, रोहित पिंजरकर, नितीन सूर्यवंशी, अविनाश देशमुख, संतोष भालेराव, शैलेश मगर, सुहास डंगारे, स्वप्नील झनकर, नामदेव पोटकुले, शिवा भोपे, सोनवणे, म्हेत्रे, विकास रेड्डी, विद्यासागर भोते, महिला पोलीस शिपाई सुषमा पाटील यांच्या पथकाने केली.