पुन्हा पाचोरा कनेक्शन ; भोपाळमध्ये 47 हजाराच्या नकली नोटा सापडल्या
जळगाव- मध्यप्रदेश राज्यातील भोपाळमध्ये एका ढाब्यावर छापा टाकून तेथील पोलिसांनी 47 हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या. याप्रकरणी भोपाळ रातीवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भोपाळ पोलिसांनी शुक्रवारी जळगावातील पिंप्राळा हुडकोतून सद्दाम कुरेशी रा. भोपाळ व त्याच्याच माध्यमातून शहरात बोलावून भुपेंद्र पाटील रा.पाचोरा या दोघांना अटक केली आहे. भोपाळमधील घटनेमुळे नकली नोटांचे पुन्हा पाचोरा, जळगाव कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. न्यायालयाच्या परवानगीने भोपाळ पोलीस संशयितांना घेवून रात्री रवाना झाले आहेत.
भोपाळमधील रातीबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक करमवीर सिंह यांना भोपाळ शहरातील साक्षी ढाब्यावर 47 हजार रुपयांच्या नकली नोटा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी पथकासह घटनास्थळ गाठले असता, छापा टाकून नोटा जप्त केल्या होत्या. यादरम्यान संशयित पसार झाले होते. नोटांमध्ये 20,50,100,200, 500, 2000 या रकमेच्या नोटा होत्या. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार नोटांची तपासणी केली असता, त्यात महात्मा गांधींचे छायाचित्र नव्हते. आरबीआय लिहिलेली पट्टी नव्हती, त्याप्रमाणे कागदही फोटोपेपर असल्याचे सिध्द झाले होते. त्यानुसार ते बनावट असल्याची खात्री झाल्यावर याप्रकरणी करमवीर सिंह यांच्या फिर्यादीवरुन 25 एप्रिल रोजी रातीवड पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
ग्राहक तयार करुन मागविले पैसे
दरम्यान मध्यप्रदेश पोलिसांनी एका जणाला विश्वासात घेतले. त्याच्यामार्फत संशयिताला फोनवरुन संपर्क साधून नकली नोटा हव्या असल्याचे सांगितले. यासाठी भोपाळ पोलिसांनी स्वतःचे पैसे खर्च केले. संशयितानेही रक्कम खात्यावर मागवून घेतली होती. पोलीस मागावर असल्याची भनक लागल्याने संशयित सावध झाले होते. यादरम्यान संशयितासोबत बोलण्याचे रेकॉर्डिंग, व मोबाईल नंबरवरुन पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला.
पहिल्या फेरीत रिकामे हाते परतले पोलीस
संशयित एक नंबरहून फक्त व्हॉटस्अॅप वापरत होता. तर दुसर्या नंबरचा वापर बोलण्यासाठी करत होता. दोन्ही नंबरच्या लोकेशनुसार करमवीस सिंह व कर्मचारी जळगावात आले. सावध असलेले संशयिताचे लोकेशन वारंवार बदलत होते. पोलीस मागावर असल्याने संशयित जागा बदलत असल्याने तो सापडला नाही. त्यामुळे त्यावेळी करमीरसिंह व कर्मचारी रिकामे हाते परतले होते.
बहिणीच्या लग्नाला जळगावात अन् अडकला जाळ्यात
पोलिसांच्या तपासात भोपाळ येथील संशयित सद्दाम कुरेशीचे नाव समोर आले होते. मात्र पोलिसांना चकवित होता. 26 रोजी सद्दाम जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको येथे आला असून त्याच्याकडे नकली नोटा असल्याची माहिती करमवीर सिंह यांना मिळाली. त्यांनी सहकारी पोलीस उपनिरिक्षक पंकज कुशवाह यांना सोबत घेत शुक्रवारी सकाळी जळगाव गाठले. यानंतर पोलिसांनी सद्दामला त्याच्या बहिणीच्या घरुन ताब्यात घेतले. त्याच्याजवळ लग्नासाठी आणलेली 1 लाख 40 हजाराच्या कनकली नोटाही मिळून आल्या असून त्या जप्त केल्या.
सद्दामच्या माध्यमातून भुपेंद्रला शहरात बोलावून केली अटक
सद्दामला ताब्यात घेवून पोलीस त्या हद्दीतील पोलीस ठाण्यात आले. याठिकाणी नोंद केली. त्याची विचारपूस केल्यावर त्याने पाचोरा येथील भुपेंद्रचेही नाव सांगितले. करमवीर सिंह यांनी सद्दामला त्याच्या मोबाईलवरुन फोन लावून जळगावात एका ठिकाणी बोलावले. याठिकाणी सापळा रचून बसलेल्या करमवीर सिंह व कुशवाह यांनी भुपेंद्रलाही अटक केली. त्याच्याकडेही नकली नोटांचे 20, 50,100,200,500 असे नोटांचे नमुने मिळून आल्याचेही करमवीर सिंह यांनी सांगितले. दोघांना भोपाळला घेवून घेण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आले. परवानगी घेवून भोपाळ रात्री रवाना झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने पाचोर्यात छापा टाकून बनावट नोटा बनविणार्यांचा कारखाना व रॅकेट नष्ट केले होते. आता पुन्हा या घटनेमुळे नकली नोटांचे पाचोरा कनेक्शन समोर आले आहे. 10 तसेच 15 रुपयांच्या टक्केवारीवर सद्दामने या नकली नोटा भोपाळला चलनात आणल्याचीही माहिती समोर आली आहे.