‘नको असलेले द्या व हवे असलेले घेऊन जा’चा उपक्रम

0

एरंडोल । एरंडोल शहरात मैत्री संघातर्फे एका आठवड्यासाठी उल्लेखनीय कार्य करण्यात येत आहे. धरणगाव -म्हसावद रस्त्यावरील टेनिस क्लब मैदानाजवळ लोकांकडून नको असलेल्या दैनंदिन वस्तू घेऊन व ज्यांना हवे असेल अशा गरीब गरजू लोकांसाठी त्या वस्तू मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रविवारी 19 फेब्रुवारी रोजी 4 वाजेपासून रा.ती.काबरे विद्यालयाजवळील टेनिस मैदानाजवळ मैत्री संघाकडून एका स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. आपल्याकडील दैनंदिन जीवनातील वापरात येणार्‍या व आपल्याला नको असलेल्या वस्तू त्यात कपडे, चप्पल, खेळणी, वह्या, पुस्तके, शाळेचे दप्तर अशा नको असलेल्या आम्हास आणून द्याव्या, जेणे करून आम्ही ते गरजू व गरीब लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू. पुढील एका आठवड्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मैत्री संघाकडून नको असलेल्या वस्तू सुरु असलेल्या स्टॉलवर सहकार्य करण्याचे आवाहन मैत्री संघातर्फे एरंडोलकरांना करण्यात आले आहे. शहरातील धरणगाव चौफुलीवर मोफत जलसेवाही संघातर्फे सुरु करण्यात आली आहे. माणुसकीची भिंत आपला धर्म माणुसकीचा, आपली अनावश्यक वस्तु कोणाचीतरी गरज असू शकते. कोणा गरजुच्या मदतीस धावा, तुमची मदत कोणाची तरी गरज पूर्ण करू शकते व या कार्यास जास्तीत जास्त लोकांनी हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मैत्री संघ असे उल्लेखनीय सामाजिक उपक्रम एरंडोल शहरात नेहमी राबवत असतात. सदर मैत्री परिवारात विशेष म्हणजे 18 ते 20 वयोगटातील तरुण काम करीत असुन आजच्या युगात तरुण वर्ग भरकटत असतांना व जास्तीत जास्त सोशल मिडिया सोबत आपला वेळ वाया घालत असुन या युवकांनी केलेले हे कार्य विशेष लक्ष वेधून घेत असून सर्वस्थरातून कौतूक होत आहे.