नक्षलवादाची कीड ठेचून काढा!

0

नक्षलवाद हे अपयशी व्यवस्थेचे अपत्य आहे, असे म्हटले जात असले तरी, या देशातील व्यवस्था सुधारविण्यासाठी हाती बंदूक घेण्याची अन् ती आपल्याच लोकांवर चालविण्याची मुभा नक्षलवाद्यांना कुणी दिली? या देशातील लोकशाही व्यवस्थेत असंख्य त्रृटी आहेत. या त्रृटी मान्य करून आणि त्या दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करूनच लोकशाही व्यवस्थेचे गाडे पुढे हाकलावे लागणार आहे. शेवटी भारत हा सर्वांचा देश आहे अन् त्यामुळे येथील सुविधा, साधनसामग्री आणि संपत्ती सर्वांना समप्रमाणात मिळायला हवी, याबाबत कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. गेल्या सहा-सात दशकांच्या काळात तसे होऊ शकले नाही. म्हणून, भविष्यातही तसे होणार नाही, असे समजून जर कुणी हिंसक मार्गाचा अवलंब करत असेल तर त्याचे समर्थन होऊ शकत नाही. आताची नक्षल चळवळ भरकटली आहे, तिला चीनसारख्या शत्रूराष्ट्राने खतपाणी घालून ती रक्तरंजित केली अन् आपल्याच लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते भारताविरुद्ध युद्ध खेळत आहेत.

क्रांती बंदुकीच्या नळीतूनच घडते असे समजणे हे पूर्णपणे दुधखुळेपण असून, तसे असते तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही बंदुकीच्या नळीचाच मार्ग स्वीकारून देशाच्या स्वातंत्र्याची लढाई लढली असती. यदाकदाचित हा मार्ग स्वीकारला असता तर आजही हा देश पारतंत्र्यात असता, बंदुकीच्या नळीच्या मार्गावरील भारताला चिरडणे इंग्रजांना फार सोपे होते. इंग्रजांनी शरणागती पत्कारली ती अहिंसक आंदोलनापुढे, महात्म्याच्या उपोषणापुढे अन् छातीवर गोळ्या झेलणार्‍या भारतीयांच्या धिरोत्तपणापुढे! शोषित, वंचित अन् उपेक्षितांच्या हक्कासाठी हातात बंदूक घेऊन लढण्याची भाषा नक्षलवादी करत असले तरी, त्यांची चळवळ आता पूर्णपणे दिशाहिन झाली आहे. उद्देशापासून ते भरकटले आहेत, अन् त्यांचे उद्दिष्ट रक्तपाताने साध्य होणारे नाही, याची जाणिव त्यांना करुन द्यावी लागणार आहे. गेल्या चार दशकांपासून केंद्र अन् संबंधित राज्य सरकारे या नक्षलनेत्यांशी चर्चा करत आहेत. दुर्गम अन् जंगली असलेला हा भाग विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. शिक्षण, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य अशाप्रकारच्या मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सरकार नावाची यंत्रणा या भागात काम करू इच्छित आहे. परंतु, या यंत्रणेवर हल्ले करून विकासाच्या योजना या भागात पोहोचू न देण्यासाठी नक्षलवादी हातात बंदुका घेऊन आडवे येत आहेत. विकास झाला तर गोरगरीब आदिवासी देशाच्या मूळप्रवाहात सामिल होतील अन् मग् नक्षल चळवळीचे कामच संपुष्टात येईल, अशी भीती या मंडळींना आता वाटू लागली आहे.

खरे तर नक्षल चळवळ विसर्जित करण्याची आज गरज आहे. या चळवळीचे काहीही प्रायोजन आता उरले नसून, तिचे उत्तरदायित्व संपले आहे. या मंडळींना काही सुधारणा हव्या असतील तर त्यांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे. निवडणुका लढवाव्यात, जनमत हासिल करावे अन् सत्ताधारी होऊन हव्या त्या सुधारणांसाठी आग्रह धरावा. या मंडळींना निवडणुका लढण्यापासून कोणी रोखले? सत्ता प्राप्त करण्यापासून कोणी रोखले? परंतु, ही मंडळी असे करू शकत नाही. कारण, त्यांना गोरगरीब आदिवासींचा विकास नको आहे; तर रक्ताची लागलेली चटक भागविण्यासाठी ते हिंसाचाराचा मार्ग अवलंबत आहेत. एकप्रकारे ते आदमखोर झाले आहेत. त्यामुळे या लोकांशी चर्चा अन् संवादाचे सर्व मार्ग आता केंद्र व राज्य सरकारने बंद करावेत, अन् थेट लष्करी मोहिम आखून त्यांना मुळासकट उपटून फेकावे. महाराष्ट्र, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, ओदिशा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू यासारखी राज्ये या नक्षल चळवळींनी ग्रासली गेली आहेत. पोलिस, सरकारी अधिकारी, आणि सुरक्षा यंत्रणांच्या जवानांसह त्यांनी सर्वसामान्यांचे बळी घेतले आहेत. दहशतवाद्यांना आणि नक्षलवाद्यांना वेगवेगळा निकष लावण्याची आता अजिबात गरज नसून, दहशतवाद्यांना ज्या भाषेत उत्तर दिले जाते, त्याच भाषेत आता नक्षलवाद्यांनाही उत्तर द्यावे लागणार आहे.

लोकशाही व्यवस्थेच्या मुळावर उठलेली ही चळवळ एखाद्या दहशतवादी चळवळीपेक्षा वेगळी नाही. लाल क्रांती घडवून हा देश ताब्यात घेण्याचे त्यांचे स्वप्न कदापिही पूर्ण होणारे नाही, याची त्यांना जाणिव असली तरी अखेरच्या श्‍वासापर्यंत रक्तपात करतच राहू, हा त्यांचा अट्टहास देशवासीयांच्या मुळावर उठला आहे. अन् तो खंबीर भूमिका घेऊनच मोडित काढावा लागणार आहे. या देशाची व्यवस्था जवान किंवा सुरक्षा यंत्रणा चालवत नाहीत. तर राजकारणी चालवतात, हे या नक्षलवाद्यांना कळत नाही का? गरिबांचे शोषण होत असेल तर ते रोखण्यासाठी नक्षलवाद्यांनी राजकीय प्रवाहात यावे, सत्ताधारी व्हावे अन् हे शोषण रोखावे. देशातील भ्रष्टनेते ही मोठी समस्या आहे, असे जर त्यांचे तत्वज्ञान असेल तर मग् तुम्हीच नेते व्हा! त्यासाठी तुम्हाला कोणी रोखले? बुद्ध, महावीर आणि गांधींच्या या देशात रक्तपात सहन केला जाणार नाही. रक्त सांडूनच जर हा रक्तपात थांबत असेल तर केंद्र व राज्य सरकारने आता लष्करी मोहीम हाती घ्यावी व नक्षलवादाची भरकटलेली कीड ठेचून काढून नष्ट करावी. त्याशिवाय दुसरा काहीही उपाय आता उरलेला नाही.