गडचिरोली : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. संवेदनशील जागांवर सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. दरम्यान गडचिरोली येथे होणारा संभाव्य घातपात टळला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात ऐन निवडणुकीत मोठा घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव पोलिसांनी उधळला आहे. चातगाव-कटेझरी मार्गावरील पुलाखाली नक्षलवाद्यांनी स्फोटके पेरून ठेवली होती. पण ही स्फोटके शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तीन ते चार किलो एवढी होती स्फोटके होती. एक वाहन उडवण्याची क्षमता असलेली ही स्फोटके असल्याची माहिती समोर येत आहे. नक्षलवादी खूप मोठा घातपात करण्याच्या तयारीत आले होते. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव यशस्वी झाला नाही. सकाळी पोलिसांनी ही स्फोटके शोधली आणि बॉम्ब शोधक नाशक पथकाला जंगलात पाचारण करण्यात आले. त्यानंतर बॉम्ब शोधक नाशक पथकाने ही स्फोटके निकामी केली. विशेष म्हणजे हे घटनास्थळ चातगाव पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या यातून घातपाताचा कट होता हे स्पष्ट झाले आहे.