खासदार अमर साबळे यांचे पत्रकार परिषदेत आवाहन
पिंपरी : प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असताना बाबासाहेबांनी आखून दिलेल्या मार्गावर मार्गक्रमण करण्याऐवजी, प्रकाश आंबेडकर हे भरकटले आहेत. त्यांनी नक्षलवादी चळवळीला समर्थन दिल्याने त्यांच्यापासून आंबेडकरवादी व पुरोगामी समाजाने सावध राहिले पाहिजे. नक्षलवाद्यांकडून भविष्यात घातपात होण्याची शक्यता आहे. असा घातपात झाला तर समाजावर दूरगामी परिणाम होऊ शकतो. नक्षलवादी, त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे सहानुभूतीदार असलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या भूलथापांना दलित संघटनांनी बळी पडू नये असे, आवाहन खासदार अमर साबळे यांनी केले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार साबळे बोलत होते.
दलित संघटनांना टार्गेट करण्याचा संकल्प
खासदार साबळे पुढे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी 2013 मध्ये सांगितले होते की, नक्षलवादी हे देशाचे खरे मित्र आहेत. नक्षलवादी नेते मिलिंद तेलतुंबडे हे प्रकाश आंबेडकर यांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांच्यावर सरकारने 50 लाखांचे बक्षीस ठेवले आहे. मिलिंद तेलतुंबडे याने लिहिलेला पत्रव्यवहार समोर आला आहे. त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांमुळे भविष्यात दलितांचे समर्थन आपल्या नक्षलवादी चळवळीला मिळेल असे त्यात म्हटले आहे. आदिवासी हत्या तसेच आदिवाशी भागात पोलिसांच्या विकासासाठी झालेला प्रयत्न यातून अल्पसंख्याक गट आणि दलित संघटनांना टार्गेट करण्याचा संकल्प नक्षलवाद्यांनी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी 300 कोटी रक्कम खंडणीच्या माध्यमातून गोळा करून देशातील दलितांमध्ये असंतोष पसरवायचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न होता. रोहित वेमुला हा दलित नसताना तो दलित आहे असे भासविण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे देशात उद्रेकाचा प्रयत्न झाला.
पुरोगामी कार्यकर्त्यांची राज्यव्यापी बैठक
पुणे पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी काहीजण दलित नाहीत. त्यांचा अतिरेकी व सीपीआय मावोवादी या संघटनांशी संबंध असून ते देशात हिंसक कारवाया करून अराजकता माजविणार्या नक्षलवाद्यांशी संपर्क असल्याचे पुरावे मिळाल्याने सर्वांना अटक करण्यात आली आहे. ते दलित संघटनांचे प्रतिनिधी आहेत अथवा कोरेगाव भीमा दंगलीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग झाला म्हणून अटक केलेली नाही. सुधीर ढवळे आणि इतरांना अटक केल्यानंतर नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरी दलित संघटना आणि परिवर्तनवादी पुरोगामी कार्यकर्त्यांची राज्यव्यापी बैठक बोलावण्याची धमकी एल्गार परिषदेने दिली आहे, असे खासदार साबळे म्हणाले.
गौतम बुद्ध यांच्या वाटेवर चालावे
31 डिसेंबरच्या एल्गार परिषदेमध्ये 250 संघटना सहभागी झाल्याचे सांगितले जाते. कोरेगाव भीमा दंगलीचा तपास आयोग पातळीवर सुरु आहे. त्यामुळे दलित संघटनावर पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही. तरीसुद्धा दलित संघटनांना ओढून त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण करून सामाजिक अराजकता निर्माण करणे व त्या सामाजिक दबावातून आपली सुटका करून घेण्याचे तथाकथित नक्षलवाद्यांचे षडयंत्र आहे. यांच्यापासून आंबेडकरवादी समाज व संघटनांनी सावध राहिले पाहिजे. नक्षलवाद्यांनी गडचिरोली आणि नक्षली भागात 25 दलितांची व 341 आदिवासींची हत्या केली आहे. परंतु शहरी नक्षलवाद्यांनी आणि त्यांचे सहानुभूतीदार असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी कधीही त्या हत्येचा निषेध केला नाही. हत्या करणारे नक्षलवादी देशाचे खरे मित्र आहेत असे प्रकाश आंबेडकर यांना वाटते. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे नक्षलवादी चळवळीला दलितांचे समर्थन लाभेल, असा नक्षलवाद्यांच्या पत्र व्यवहारातील पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. हे वास्तव लक्षात घेऊन प्रकाश आंबेडकर यांच्या प्रभावाखाली आलेल्या बोटावर मोजक्या असलेल्या दलित संघटनांनी सावध होऊन डॉ. आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या सद्धर्माच्या वाटेवर चालावे, असे आवाहन खासदार अमर साबळे यांनी यावेळी केले.