नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 11 जवान शहीद

0

रायपूर : छत्तीसगडमधील सुकमा या नक्षलग्रस्त जिल्ह्यात भेज्जी परिसरात नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तुकडीवर शनिवारी केलेल्या गोळीबारात 11 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान सराव करत असताना अचानकच त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. सकाळी सुमारे 9 च्या सुमारास हा हल्ला झाला. हे सर्व जवान 219 बटालियनचे आहेत. जखमी जवानांना तातडीाने रुग्णलायता दाखल करण्यात आले. या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी जवानांची हत्यारे आणि रेडिओ सेट पळवून नेल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी सीआरपीएफ व पोलिसांच्या तुकडीने तातडीने शोध मोहीम हाती घेतली असून, सुकमा जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले. तसेच, शहीद जवानांना आदरांजलीही अर्पण केली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍यांना या घटनेबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेशही पंतप्रधानांनी दिले आहेत. दरम्यान, नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यातील माजी सरपंचाची शुक्रवारी हत्या केली होती. माजी सरपंच पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन त्याला मारण्यात आले होते.