रायपूर : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सोमवारी दुपारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 26 जवान शहीद झाले असून, सात जवान गंभीर जखमी झाले आहेत. या चकमकीत पाच नक्षलवादीही मारले गेल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही काळातील नक्षलवाद्यांचा हा मोठा हल्ला असून, राज्य व केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. सुकमा जिल्ह्यातील सुरक्षा वाढवण्यात आली असून, नक्षलवाद्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.
सुकमा जिल्ह्यातील बर्कापाल- चिंतागुफा मार्गावर दुपारी 12.25 च्या सुमारास हा हल्ला झाला. दक्षिण बस्तरमधील सुकमा जिल्हा नक्षलग्रस्त असून, नक्षलवाद्यांनी या आधीही या भागातच मोठा िहिंसाचार केला आहे. त्यामुळे या भागातील रस्ता सुरक्षेचे काम सीआरपीएफच्या 74 व्या बटालियनकडे सोपवण्यात आले आहे. बर्कापाल- चिंतागुफा मार्गाचे काम सुरू असून, या मार्गाच्या पाहणीस जवानांची तुकडी गेली होती. या तुकडीवर नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केला, असे सुकमाचे पोलीस अधीक्षक जितेंद्र शुक्ला यांनी सांगितले.
नक्षलवाद्यांनी प्रथम स्फोट घडवून आणला. त्यानंतर जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात 24 जवा शहीद झाले, तर सहा जवान गंभीर जखमी झाले. या हल्ल्याची माहिती मिळताच अतिरिक्त कुमक घटनास्थळी पाठविण्यात आली. हल्ल्यानंतर नक्षलवादी जंगलात पळून गेले. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा शस्त्रसाठाही नक्षलवाद्यांनी पळवून नेला. जखमी जवानांना तातडीने रायपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत, असेही शुक्ला यांनी सांगितले.
तीनशे नक्षलींनी केला हल्ला
सीआरपीएफच्या या तुकडीत सुमारे 90 जवान होते. आमच्या तुकडीची माहिती काढण्यासाठी नक्षलवाद्यांनी काही गावकर्यांना पाठवले होते. त्यानंतर सुमारे 300 नक्षलवाद्यांनी अचानकच आमच्या तुकडीवर हल्ला केला. जवानांनीही नक्षलवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात अनेक नक्षलवादीही मारले गेले आहेत, असे या तुकडीतील जखमी जवान शेर मोहमंद यांनी नंतर पत्रकारांना सांगितले. मी स्वतः सुमारे चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले, असेही त्यांनी सांगितले.
रमणसिंहांनी घेतला आढावा
केंद्र व छत्तीसगड सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. सुकमा जिल्ह्यातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी दिल्लीत होते. त्यांनी दिल्लीतील आपल्या सर्वे भेटी रद्द करून तातडीने रायपूर गाठले. संध्याकाळी वरिष्ठ अधिकार्यांची तातडीने बैठक घेऊन घटनेची माहिती घेतली. तसेच, सुरक्षेबाबत सूचनाही दिल्या. बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा आणि उपमहानिरीक्षक सुंदरराज यांनीही तातडीने सुकमात जाऊन घटनास्थळास भेट दिली.
सर्वपक्षीय निषेध
नक्षलवाद्यांच्या या हल्ल्याचा समोवारी सर्वच पक्षांनी जोरदार निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अन्य पक्षांच्या नेत्यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली. हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच, नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे आमचे मनोबल खच्ची होणार नाही. त्यांना योग्य तो धडा शिकवला जाईल, असे सांगत शहीद जवानांच्या कुटुबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
नक्षलवाद्यांना धडा शिकवू
सुकमा जिल्ह्यातील सोमवारची घटना अत्यंत निंदनीय आहे. नक्षलवाद्यांनी भ्याडपणे जवानांवर हल्ला केला आहे. जवानांचे हौतात्म्य आम्ही वाया जाऊ देणार नाही. नक्षलवाद्यांना योग्य तो धडा शिकवला जाईल आणि त्यासाठी छत्तीसगड सरकारला सर्व साह्य पुरवले जाईल. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान