नगर शहराचा नरक बनला असून, नगरकरांच्या नशिबी नरकयातना आल्या आहेत. ज्या नगरने राज्याला आदर्श नेतृत्वाचा पायंडा घालून दिला, त्याच नगरमध्ये आज कोतकर-कर्डिले-जगताप या त्रिकुटाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला दिसतो. भरचौकात आणि सर्वांसमोर पडलेल्या दोन मुडद्यांमुळे नगरमध्ये बिहारसारखे जंगलराज निर्माण झाल्याचे उघड झाले. राज्यातील भाजप सरकारने या त्रिकुटाचा वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा उद्या संयमाचा अंत झालेल्या नगरकरांनी कायदा हातात घेतला तर त्याचा बोल कुणाला लावू नये.
साखरसम्राटांचा, साखर कारखानदारीचा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. शिर्डी येथील संत साईबाबा यांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली, मानवतावादाचे सर्वात मोठे केंद्र म्हणून आजही साईसमाधीची जगभरात ओळख आहे. असे असले तरी, आज नगर जिल्ह्याची ही ओळख अलिकडे पुसली जात आहे. दलित अत्याचारांच्या घटनांत नगर जिल्हा अव्वल असून, नगर शहराचा तर बिहार झाला की काय? अशी शंका येते. खरे तर या जिल्ह्यात कर्मवीर डॉ. विठ्ठलराव विखे, बाळासाहेब विखे, शंकरराव काळे, यशवंतराव गडाख, भाऊसाहेब थोरात यासारखे दिग्गज नेते जन्माला आलेत, त्यांनी या जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याला आदर्श नेतृत्वाची दिशा दिली. सहकारी संस्थांच्या निकोप उभारणीतून प्रत्येकाचा विकास, शैक्षणिक संस्थांच्या उभारणीतून शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या दारात पोहोचविण्याचे कार्य या नेतृत्वाने केले. परिणामी, गोरगरीब, उपेक्षितवर्गाला त्यांनी आर्थिक व शैक्षणिक संपन्नता आणली. एकीकडे असे समाजाच्या जडणघडणीत मोलाचे कार्य उभे करणारे नेतृत्व या जिल्ह्यात निर्माण झाले असताना, दुसरीकडे कोतकर-कर्डिले-जगताप यासारख्या नेतृत्वाचाही उदय झाला. गुंडगिरी, धाकदपट, आणि सर्वसामान्यांवरील अत्याचार, निरपराधांचे मुडदे पाडणे यामुळे या त्रिकुटाने नगर जिल्ह्याचा पुरता बिहार करून टाकला आहे. दुर्देवाने, ज्यांनी आदर्श नेतृत्वाचा पायंडा पाडला, त्यांच्याच पिढ्यातील आजचे राजकारणी या त्रिकुटाला राजकीय हेतूसाठी पाठिशी घालण्याचे पाप करत आहेत.
महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर नगर शहरात भरचौकात आणि सर्वांसमोर झालेल्या दोन हत्यांमुळे नगर शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरून गेला. या हत्याकांडामुळे कोतकर-जगताप-कर्डिले या सोयरेधायर्यांची गुंडगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. धक्कादायक बाब अशी की, पोलिस अधीक्षक कार्यालयावर गुंडांनी हल्ला करून आरोपीला खांद्यावर उचलून पळवून नेण्याचे प्रकार तिकडे बिहारमध्ये होत असतात. एखाद्या सिनेमात शोभावा असा हा प्रकार नगर पोलिस अधीक्षक कार्यालयात घडला. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थकांनी एसपी कार्यालयात धुडगूस घालून, तोडफोड करत सर्व पोलिस अधिकार्यांसमोर सिनेस्टाईल आ. जगताप यांना पळवून नेले. पोलिस फक्त हातावर हात धरून हा सर्व तमाशा पाहात राहिले. यावरून जगताप व संबंधित त्रिकुटाची शहरवासीयांसह पोलिसांवरदेखील किती दहशत आहे, याची प्रचिती आली. नगर जिल्ह्याच्या इतिहासात थेट एसपी कार्यालयावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिवसेना उपशहरप्रमुखासह एका निष्ठावंत शिवसैनिकांच्या हत्येचा कट रचणे व हत्या करणे याप्रकरणी नगर शहर-जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भानुदास कोतकर, नगरचे माजी महापौर असलेले कोतकर यांचे चिरंजीव संदीप कोतकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुणकाका जगताप व त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप यांच्यासह भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले हे मुख्य आरोपी आहेत. यातील शिवाजीराव कर्डिले यांच्या दोन मुली या कोतकर व जगताप यांच्या घरात दिलेल्या आहेत. म्हणजेच, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप व काँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकर हे कर्डिले यांचे जावाई आहेत. अशा प्रकारे नगर शहरात सोयर्याधायर्याचे राजकारण चालत असून, सत्ता कुणाही राजकीय पक्षाची असली तरी, ती कोतकर-कर्डिले-जगताप यांच्याच घरात राहात आली आहे.
या सत्तेतून या त्रिकुटाच्या डोक्यात गुंडगिरीची जोरदार हवा घुसली असून, विरोधात जाणार्याला ते साम-दाम-दंड-भेद या नीतीने संपवित असतात. केडगावमध्ये शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन निवडणूक प्रचार करणार्या शिवसेना पदाधिकार्यालाही त्यांनी याच मानसिकतेतून संपविले, अशी शहरात दबक्या आवाजात चालणारी चर्चा म्हणूनच अत्यंत गंभीर आहे. खरे तर नगर जिल्ह्याला कृष्णप्रकाश प्रसाद यांच्यासारख्याच खमक्या अधिकार्याची गरज आहे. लॉटरीचालक अशोक लांडे खूनप्रकरणात कृष्णप्रकाश यांनी कोतकर आणि कर्डिले यांच्या मुसक्या आवळत त्यांना बेड्या ठोकल्या होत्या. या खूनप्रकरणी कोतकर याच्यासह त्याच्या तीनही मुलांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. तर आ. कर्डिले यांनाही त्यांनी बराचकाळ तुरुंगात डांबले होते. सद्या वैद्यकीय कारण सांगून भानुदास कोतकर हा तुरुंगातून सुटलेला आहे, तो बाहेर असताना केडगावात घडलेले हत्याकांड त्याच्या इशार्यावरून आणि कटानुसारच घडविले गेले, असा शिवसेना नेत्यांनी केलेला आरोप गंभीर असून, त्याचा स्वतंत्र तपास आता पोलिस करत आहेत. परंतु, हा तपासही निरपेक्ष होईल का? याबाबत प्रत्येकाच्या मनात संशय दाटून आलेला आहे. आज तरी पोलिसांवर कुणाचाच विश्वास नाही. खरे तर नगरचा आता अक्षरशः नरक झाला असून, त्याला हे त्रिकुटच कारणीभूत आहेत. त्यांनी पोसलेल्या गुंड-पुंडांकडून मुली, महिलांवर होणारे अत्याचार तर नित्याच्याच बाबी झाल्यात. त्याबद्दल कुणीही वाच्यता करत नाहीत. कोपर्डीची घटना राज्यात गाजली होती. परंतु, शालेय मुलींवरील अत्याचाराचा असंख्य घटना या केवळ दहशतीमुळे पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचतच नाहीत. पर्डीकांडानंतर पंधरा दिवसातच जिल्ह्यात विविध ठिकाणी विनयभंग व बलात्काराच्या घटना घडल्यात. त्यादेखील पोलिसांपर्यंत पोहोचल्या नाहीत, इतकी दहशत या भागात वाढली आहे.
नगरला पुन्हा पूर्वेतिहासिक सन्मान प्राप्त करून द्यायचा असेल तर कोतकर-कर्डिले-जगताप ही घाण वेळीच साफ करावी लागणार आहे. राज्याचे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या दुबळ्या व्यक्तीकडे आहे, त्यामुळे ते ही घाण साफ करण्याची इच्छाशक्ती दाखवतील, असे अजिबात वाटत नाही. शिवाय, या सगळ्या प्रकरणात त्यांचाच एक आमदार अडकलेला आहे. राज्यात सत्ता कुणाचीही आली तरी या त्रिकुटाचे काहीच वाकडे होत नाही, कारण यापैकी कुणी तरी एक पुन्हा सत्तेत सहभागी झालेला असतो. त्यामुळे नगरकरांना अक्षरशः वेठीस धरले गेले असून, एकवेळ नगरकरच कायदा हातात घेतील, अशी सार्थ भीती निर्माण झाली आहे. दुर्देवाने संयमाचा अंत झाल्यानंतर नगरकरांनी कायदा हातात घेऊन या त्रिकुटाला धडा शिकविला तर त्याला दुबळे गृहमंत्री आणि राज्य सरकारच जबाबदार असेल. भरचौकात दोघांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने तोडून हत्या घडविली जाते. तत्पूर्वी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. शिवसेनेचे नेते पोलिसांना या सर्व बाबीची कल्पना देतात व तातडीने केडगावात कुमक तैनात करण्याची मागणी करतात, तरीही पोलिस या बाबीकडे दुर्लक्ष करतात. म्हणजेच, या हत्याकांडात पोलिस अधिकारीही सहभागी होते का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. नगर शहरात जे काही चालू आहे, ते बिहारमधील जंगलराजची आठवण करून देणारे आहे. राज्यातील भाजप सरकारला नगरचा कलंक शोभणारा नाही!