पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अटक करून घेणार
शिवसेना पदाधिकार्यांचे हत्याकांड : शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर धाव
मुंबई/अहमदनगर : शिवसैनिकांचे मृतदेह पाहून संताप होणे साहजिक आहे, मात्र शिवसैनिकांनी कोणताही उद्रेक होवू न देता शांतता व संयमाने परिस्थिती हाताळली. तरीही पोलिसांनी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे गुन्हे दाखल झालेले सर्व सहाशे शिवसैनिक मंगळवारी (दि.17) मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी स्वत:ला अटक करवून घेणार आहेत. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसेनेचे सर्व जिल्हा, तालुका पदाधिकार्यांनी रविवारी सकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. त्यांना केडगाव हत्याकांडानंतरची परिस्थिती समजावून सांगितली. त्यानंतर ठाकरे यांच्यासह सर्व शिवसैनिक मंगळवारी वर्षा बंगल्यावर जावून अटक करवून घेतील, असा आदेश दिला. यावेळी खुद्द ठाकरे हेही वर्षा बंगल्यावर उपस्थित राहणार आहेत.
आज दशक्रिया विधी, दोन मंत्री हजर राहणार
केडगाव येथे 7 एप्रिलरोजी शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि शिवसैनिक वसंत ठुबे या दोघांची भरचौकात निर्घृण हत्या झाली होती. या हत्येनंतर शिवसैनिकांनी रास्ता रोको, दगडफेक, पोलिस कर्मचारी, अधिकार्यांना धक्काबुक्की व वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह नगरसेवक, पदाधिकार्यांसह 600 जणांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी (दि.16) केडगाव येथील शांतीवनात मृत शिवसेना पदाधिकार्यांचा दशक्रिया विधी होणार आहे. यावेळी शिवसेनेचे पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि बांधकाममंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सर्व शिवसैनिक मुंबईकडे रवाना होतील. त्यानंतर मंगळवारी सकाळी वर्षा बंगल्यावर शिवसैनिक अटक करवून घेतील. जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी शिवसैनिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोपही पदाधिकार्यांनी केला.
उद्धव ठाकरे 25 तारखेला नगरमध्ये!
दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 25 एप्रिलरोजी नगरमध्ये येणार आहे. ते कोतकर व ठुबे या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. शिवसेना पदाधिकार्यांच्या हत्येनंतर नगरमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला असून, कोतकर-जगताप-कर्डिले या त्रिकुटाच्या गुंडगिरीची दाहकता उघड झाली आहे. त्यामुळे या दौर्यात उद्धव ठाकरे काय भूमिका जाहीर करतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागलेले आहे.