नगरदेवळा येथे शाहिरी प्रशिक्षण शिबीर उद्घाटन उत्साहात

0

नगरदेवळा । महाराष्ट्र शासन व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्य संयुक्त विद्यमानाने शाहीरी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन नगरदेवळा येथील सखाराम महाराज वाडीच्या सभागृहात मंगळवार 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. प्रमुख पाहूणे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संजय पाटील, पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी मनिषा खत्री व प्रख्यात कवी तथा समिक्षक शिरपूर व महसुल विभागाचे अधिकारी प्रा.डॉ. फुला बागुल यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक, शिवनारायण जाधव, शाहीर शिवाजीराव पाटील व सहकारी शाम शिंपी, कवी गो. शि. म्हसकर यांच्या उपस्थितीत नटराज व सरस्वती पूजन करुन उद्घाटन समारोह झाला.

विविध विषयांवर होणार व्याख्यान
सदर शिबीर 20 दिवसांचे निवासी शिबीर असून शासनाकडून 20 विद्यार्थी व विद्यार्थींनींची निवड करण्यात आली आहे. दोन सत्रात शिबीर होत असून दररोज महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले शाहीर प्रशिक्षक म्हणून लाभणार आहेत. 28 रोजी शिबीराचे उद्घाटन, 1 मार्च रोजी शाहिरी परंपरेचा इतिहास, 2 मार्च रोजी राष्ट्रीय एकात्मता व महाराष्ट्राच्या शाहिरीचा इतिहास, 3 रोजी शाहिरीचे प्रकार, 4 रोजी शिवकालिन शाहिरी, 5 रोजी शाहिरीचे गुणवैशिष्ये, 6 रोजी स्वातंत्रोत्तर काळातील शाहिरी, 7 रोजी पोवाडा सादरीकरणातील विविध प्रकार, 8 रोजी लोकसंस्कृतीचे जतन करून कार्यात सहभाग, 9 रोजी ऐतिहासिक पोवाळ्यातील गुणवैशिष्ये, 10 रोजी स्वातंत्र्यसंग्रामात शाहिरीचे योगदान, 11 रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहिरीचे योगदान, 12 रोजी प्रसारमाध्यमात शाहिर सादरीकरणाचे तंत्र, 13 रोजी शाहिरी कार्यक्रमात वाद्यांची उपयुक्तता, 14 रोजी समाज परीवर्तनात योगदान, 15 रोजी शाहिरी लावण्या व प्रकार, 16 रोजी स्मरण, स्फुर्ती व लोक गितेचे प्रकार, 17 रोजी सांस्कृतीचा वारसा जोपासणारी लोकरंजनात्मक शाहिरी, 18 रोजी शिवकालीन शाहिरीचा इतिहास, 19 रोजी शिव समारोप व कार्यक्रमांची सांगता.

दररोज दोन सत्रात शिबीर होणार
उद्घाटन प्रसंगी प्रा. फुला बागुल यांनी ह्या शिबीरासंबधी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करुन महत्त्व पटवून दिले. महाराष्ट्र प्रथमच ग्रामीण भागात असे शिबीर भरवून ग्रामीण भागातील मुला-मुलींना आपली लोककला व संस्कृतीची माहिती होऊन यातूनच महाराष्ट्रात नविन रक्ताचे शाहीर तयार होतील व सांस्कृतिक इतिहासात जिल्ह्याचे नाव होऊन आदर्श निर्माण होईल. महाराष्ट्र शासनाने शाहिरी क्षेत्रात मुला बरोबरींनी मुलींनी शाहिरी क्षेत्रात आवर्जून उतरावे असे धोरण ठेवले आहे. त्यामुळे हे शिबीर प्रथमच जिल्हा मुख्यालया व्यतिरिक्त ग्रामीण भागात घेण्यात येत आहे असे नमुद केले. आभार प्रदर्शन शिवाजी पाटील यांनी केले. सुत्रसंचालन बावस्कर यांनी केले.