नगरपरिषदांध्ये भाजपाला संमिश्र यश

0

मुंबई : नवनिर्मित नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला संमिश्र यश मिळाले. नगरपंचायतींच्या पोटनिवडणुकीत भाजपाला साफ अपयश आल्याचे दिसून आले.

सांगली जिल्ह्यातील शिराळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी ११ जागा जिंकत सत्ता खेचली. भाजपाला सहा जागा मिळाल्या. अहमदनगरच्या नेवासा नगरपंचायतीत क्रांतीकारी शेतकरी पक्षाला १७ पैकी नऊ जागा मिळाल्या तर भाजपाने सहा जागा जिंकल्या.काँग३स व अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर नगरपंचायतीत भाजपाने १७ पैकी आठ जागा जिंकल्या. काँग३सला पाच, राष्ट्रवादीला एक तर अपक्षांना तीन जागा मिळाल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड नगरपंचायतीत भाजपाने नऊ तर काँग्रेसने सात जागा जिंकल्या. एक जागा अपक्षाला मिळाली. तेथे भाजपाचा नगराध्यक्ष निवडून आला.

पोटनिवडणुकीत भाजपाला भोपळा
पालघर जिल्ह्यातल्या जव्हार नगरपंचायतीत पाच जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वच्या सर्व जागा अपक्षांनी जिंकल्या. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन व लातूर जिल्ह्यातील औसा नगरपंचायतीत राष्ट्रवादीने यश मिळवले. रत्नागिरीतील चिपळूण आणि अमरावतीतील अचलपूर नगरपंचायतीत शिवसेनेला यश आले. सिंधूदूर्ग जिल्ह्यातील कसई-दोडामार्ग नगरपंचायतीत काँग्रेस जिंकली तर नंदुरबारमधल्या धडगाव-वडफळ्या नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीत अपक्षाने बाजी मारली.

बिनविरोध यश
रायगडच्या मुरूड-जंजिरामध्ये शेतकरी कामगार पक्ष, नाशिकमध्ये देवळा येथे आपक्ष, साताऱ्यात मेढा येथे शिवसेना, जळगावच्या यावल व नंदुरबारच्या नंदुरबारमध्ये काँग्रेस तर उस्मानाबादच्या उस्मानाबादमध्ये भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला.

धारणीत भाजपा
अमरावती जिल्ह्यातील धारणी पंचायत समितीच्या दहाच्या दहा जागा भाजपाने जिंकल्या. येथे विरोधी पक्षांचा एकही उमेदवार निवडून आला नाही.