नगरपरिषदेला बॅनर काढण्याच्या सूचना

0

नंदुरबार । शहरात पोष्टर वार रंगत असून पोलिस प्रशासनाने फलक, बॅनर, झेंडे काढण्याच्या सुचना नगरपरिषदेत दिल्या आहेत. दरम्यान बॅनर काढण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचार्‍यांशी काही लोकांनी हुज्जत घातल्याने उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी यांनी इशारा दिला आहे. नंदुरबार शहरात विविध कार्यक्रमानिमित्त ठिकठिकाणी बॅनर, झेंडे, पत्रके लावण्यात आली आहेत. मात्र अशा प्रकारच्या पोष्टरबाजीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न बिघडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे असे पोष्टर पालिकेने काढून घ्यावेत, अशा सुचना पोलिस निरीक्षक एम.डी.वाघमारे यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिल्या.

पालिका कर्मचार्‍यांशी नागरिकांची हुज्जत
त्यामुळे पालिकेच्या कर्मचार्‍यांनी पोष्टर बॅनर काढायला सुरूवात केली. परंतु सोनार गल्ली परिसरात या कर्मचार्‍यांशी काही लोकांनी हुज्जत घालण्याचा प्रकार केल्याचे उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरात फलके, झेंडे, पोष्टर्स लावणे बेकायदेशीर आहे. नागरिकांनी अशा प्रकारचे पोष्ट लावले असतील तर लगेच काढून घ्यावीत, असे आवाहन राजेंद्र माळी यांनी केले आहे. दरम्यान पोष्टर लावण्यावरून शहरात यापूर्वी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवलेला आहे. त्यामुळे ही कारवाई होत असल्याचे नगरपालिका प्रशासनाने कळविले आहे.