नगरपालिका इमारत खाली करा

0

वरणगाव । नगरपालिकेची इमारत सद्यस्थितीत अतिशय जिर्ण झाली असून ती महिनाभरात खाली करुन पालिकेचे कामकाज इतरत्र हलविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांना केल्या. शनिवार 1 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी शहरात अचानकपणे भेट दिली. यावेळी त्यांनी तहसिल कार्यालय, प्रांत कार्यालय, नगरपालिका कार्यालयात जाऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला, पालिकेत असताना त्यांनी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांना सुचना केली की, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली पालिकेची इमारत ही जीर्ण अवस्थेत असल्याने ही कधीही कोसळून येणार्‍या जाणार्‍यांना दुखापत होण्याची शक्यता असल्यामुळे एक महिन्याच्या आत नविन जागा पाहून नगरपालिकेचे कामकाज हलविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच पालिका आवारातील परिसरात स्वच्छता ठेवण्याचे आदेश सुध्दा जिल्हाधिकार्‍यांनी दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तहसिल कार्यालयामध्ये भेट दिली असता तहसिल परिसरात उघड्यावर शौचास जाणार्‍या व्यक्तिवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश तहसिलदार राठोड यांना दिले.

रुग्णालयाची केली तपासणी
यानंतर जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी ब्रदी प्लॉट परिसरातील डॉ. योगिता फेगडे व डॉ. प्रदीप फेगडे यांच्या रुग्णालयात भेट देऊन कागदपत्रांची तपासणी केली. भुसावळात दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी केवळ एकमेव रुग्णालयाची तपासणी केल्यामुळे हि तपासणी कशासाठी करण्यात आली याबाबत तर्कविर्तक लढविले जात होते. मात्र हि तपासणी कशा संदर्भात होती याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. यासंदर्भात प्रांताधिकारी चिंचकर यांना विचारणा केली असता हि नियमित तपासणी असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकार्‍यांनी शहरातील सर्व शासकीय कार्यालयांची पाहणी करुन याठिकाणी स्वच्छतेवर विशेष भर देण्याचे सुचविले, तसेच नगरपालिका, प्रांत कार्यालय आवारात असलेल्या भंगार वाहनांचा लवकरात लवकर निकाल लावण्याच्या सुचना केल्या.

मुदतीत 7/12 संगणीकरण न केल्यास कारवाई
तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांनी तहसिलसह पालिकेच्या कामकाजामध्येही सहकार्य करावे, अशा सुचनाही जिल्हाधिकार्‍यांनी पाहणी दरम्यान केल्या. तसेच सात बारा संगणकीकरण, ई- फेरफार नोंदी येत्या 15 एप्रिल पर्यंत पुर्ण करा. काम मुदतीत पुर्ण न करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. शासनाचा महसूल 100 टक्के वसुल करा, न केल्यास दंडात्मक कारवाई करुन दुकाने, घरे जप्त करुन 100 टक्के कर वसुली करण्याचे आदेश सुध्दा जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी केली.

24 तासात कराचा भरणा भरा
स्टेट बँकेवर 1 कोटी 2 लाखांची पालिकेच्या कराची थकबाकी आहे. यासंदर्भात पालिकाप्रशासनातर्फे बँकेला सील लावण्याची कारवाई करण्यात येत होती. मात्र याअगोदर जिल्हाधिकार्‍यांशी विचारपूस म्हणून मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता जिल्हाधिकारी लागलीच बँकेत हजर झाले. त्यामुळे सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी व्यवस्थापकांसोबत चर्चा करुन 24 तासाच्या आत कराचा भरणा करण्याच्या सुचना बँकेला दिल्या आहेत.