भुसावळ। नगरपालिका कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली असून आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात प्रशासनास निवेदन देण्यात आले तर दुसर्या टप्प्यात प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार 20 रोजी पालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात येथील कामगार संघटनेतर्फे शुक्रवार 16 रोजी निवेदन देण्यात आले आहे.
तीनदिवसीय संप पुकारण्याचा इशारा
पालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, कर्मचार्यांचे वेतन वेळेवर अदा करण्यात यावे, वेतनासाठी तीन महिन्याचे वेतनाएवढा राखीव निधी ठेवण्यात यावा, कायम व सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या वेतन तसेच पेन्शनवर 100 टक्के अनुदान मिळावे, 2016 पर्यंतच्या अनुकंपाधारकांना भरतीच्या अटी शिथील करुन कामावर नियुक्त करावे, आकृतीबंधानुसार रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावी, कामगार संघटनेबरोबर केलेल्या लेखी करारानुसार सन 2000 पर्यंतच्या रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करावे, अशा मागण्या नमूद करण्यात आल्या आहे. या मागण्या मान्य न झाल्यास 12 ते 14 जुलैदरम्यान तीन दिवसांचा लाक्षणिक संप पुकारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.