नगरपालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याकरीता निवेदन

0

नवापूर । सातवा आयोग लागू करावा यासह इतर विविध मागण्यांचे निवेदन नवापूर नगरपालिका कर्मचारी संघटनेतर्फे तहसीलदारांना देण्यात आले. त्यानंतर कर्मचार्यानी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करण्यात आला. दरम्यान शासनाने सातव्या वेतनासह इतर प्रलंबित मागण्या 12 जुलैच्या आत मान्य न केल्यास 12 ते 14 जुलै दरम्यान राज्यातील सर्व नगर परिषद, नगरपंचायती व महापालिकेतील कर्मचारी तीन दिवसाचा लाक्षणिक संपावर जातील या काळात नागरिकांना होणार्‍या असुविधा व इतर परिणामास शासन जबाबदार असेल असा इशारा संघटनेने दिला आहे. सातवा वेतन आयोग लागू करावा या मुख्य मागणीसह इतर 21 मागण्यांचे निवेदन नवापूर नगर पालिका संघटनेने तहसीलदार प्रमोद वसावे यांना दिले.

काळ्या फिती लाऊन शासनाचा निषेध : निवेदनात म्हटले आहे की नगर पालिका, नगरपंचायती, महानगर पालिका नागरिकांना 24 तास नागरी सुविधा पुरवित असतात. ज्यात रस्ते, गटार स्वच्छ करणे, शहराची साफ सफाई करणे, पाणी पुरवठा, दिवाबत्ती, अग्निशमन यासह आवश्यक सर्व सुविधा कर्मचार्या मार्फत पुरविल्या जातात.तरी ही आवश्यक मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. यावेळी निवेदन देतांना नवापूर नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद गावीत, उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सचिव परशराम ठाकरे, कोषाध्यक्ष अनंत पाटील, सल्लागार मिलिंद भामरे, भरत पाटील यांच्या सह सदस्य सुधीर माळी, युवराज पानपाटील, प्रशांत भट, मिनाक्षी वळवी, आर डी बागले, नथ्थु अहिरे, एस यु बागूल, महमंद पठाण, वामन अहिरे, राजु गावीत, विजय पाटील, बुधाजी पाटील,एस जे शिरसाठ, प्रमिला गावीत,रमेश सोनार, भगवान महाले आदी कर्मचारी उपस्थित होते.

अशा आहेत कर्मचार्‍यांच्या मागण्या
केद्र शासनाप्रमाणे सातवा वेतन लागु करावा, वेतन वेळेवर व्हावे म्हणून सहायक वेतन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला माञ ते अनुदान वेळेवर मिळत नसल्याने वेतन दोन महिने उशिरा मिळते, सहायक अनुदान ऑनलाईन पालिका खात्यावर जमा करा, किमान तीन महिने वेतनाचा निधी राखीव ठेवावा, जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रमाणे पालिका मधील कायम व सेवानिवृत कर्मचार्याचे वेतन व पेन्शन 100 टक्के अनुदान मिळावे,2016 पर्यतचा सर्व अनुकंपाधारकांना भरतीचा जाचक अटी शिथिल कराव्यात.

समान काम समान वेतन
विना अट नियुक्ती मिळावी, अग्निशमन व इतर विभागातील रिक्त पदे त्वरित भरावीत, नवीन पालिका कर्मचार्यानाही जुन्या कर्मचार्याचे सर्व लाभ मिळावेत, संघटने बाबत शासनाने केलेल्या लेखी करारा नुसार अंमलबजावणी करावी, कर्मचारी वारसांना नोकरी द्यावी, कंञाटी रोजंदारी व मानधनावरील कर्मचार्याना सेवेत कायम करावे, समान काम समान वेतन हा नियम लागू करावा, कर्मचार्यासह सफाई कामगारांना ही बारा व चौवीस वर्षाची पदोन्नती द्यावी, बोनस किंवा सानुग्रह अनुदान मिळावे, निवृत्त कर्मचार्याची थकीत रक्कम त्वरित मिळावी, रोजंदारी व कंञाटी कर्मचार्याचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम वेळेवर भरावी