शिंदखेडा । नगरपंचायत निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला असून कॉर्नर सभा चांगल्याच गाजत आहेत. निवडणूकीच्या प्रयारासाठी सकाळी आठ वाजेपासून नेत्यांची व उमेदवार प्रभागात पायपीट करीत आहे. होम-टू- होम प्रचार केल्यानंतर कॉर्नर सभा घेण्यावर उमेदवारांचा भर आहे. प्रत्येक सभेला नेत्यानी उपस्थिती द्यावी असा आग्रह उमेदवारांचा असल्याने नेत्यांची मात्र दमछाक होते आहे. भाजपा, कॉग्रेस-राष्टवादी, समाजवादी पार्टी, शिवसेना या पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रचार सभा देखील गाजत आहेत. या निवडणूक प्रचारात शहरातील पाणी प्रश्न, भाजीमंडईचा प्रश्न अग्रभागी आहे.
सोशल मीडियाचा वापर
मागील निवडणूकीत अनेक उमेदवारांच्या जाहीरनाम्यात असलेला नाना-नानी पार्क हा मुद्दा ह्या निवडणूकीत कोणत्याच उमेदवारांच्या जाहिरनाम्यात दिसत नाही. शहरातील जेष्ठ नागरीकांच्या सोई सुविधांकड़े सर्वच पक्षांनी पाठ फिरवली आहे. नगराध्यक्षसह 17 प्रभागात होत असलेल्या या निवडणूकीत प्रत्येक पक्षाने उमेदवार देतांना जातीचे समीकरण समोर ठेवले आहे. प्रत्येक प्रभागात चौरंगी लढत आहे. बहूसंख्य प्रभागात भाजपा -कॉग्रेस-राष्टवादीच्या उमेदवारांमधेच मुख्य लढत आहे. दिवसागणिक प्रत्येक पक्षाकडून नविन बॅनर लावले जात आहेत.