नगरपालिका रूग्णालय परीसरातील निवासस्थानांची दुरवस्था

0

दहा पैकी चारच कर्मचार्‍यांचा निवास : पालिका प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

भुसावळ- नगरपालिकेच्या माध्यमातून पालिका रूग्णालय परीसरात पालिकेच्या कर्मचार्‍यांसाठी दहा निवासस्थाने उभारण्यात आली आहेत मात्र या निवासस्थांनाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने दहा पैकी केवळ चारच कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कुटुंबासह या निवासस्थानांमध्ये रहिवास करीत असल्याची गंभीर बाब असल्याने पालिका प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेणे आवश्यक आहे. नगरपालिका रूग्णालयाच्या परीसरात वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली आहेत मात्र गत काही वर्षापासून निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे.

पावसाळ्यात घरांना गळती
जीर्णावस्थेत आलेल्या या निवासस्थांना पावसाळ्याच्या दिवसात गळती लागते.तसेच परीसरात पावसाळी गवत मोठ्या प्रमाणात निर्माण होते. यामुळे सरपटणार्‍या प्राण्यांचा धोका वाढला असून परीसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे तसेच रात्रीच्या वेळेस रूग्णालय परीसरातील निवासस्थानाकडील पथदिवे बंद राहत असल्याने कर्मचार्‍यांना अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळे या निवासस्थानांमध्ये कुणीही कर्मचारी निवास करण्यास अनुत्सुक असतो.

रहीवाशांचे आरोग्य धोक्यात
कर्मचारी निवासस्थान परीसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होत असल्याने निवासस्थानातील कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात आले आहे मात्र या प्रकाराकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचार्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

पालिका प्रशासनाने दखल घेण्याची आवश्यकता
पालिकेच्या निवासस्थानांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने या निवासस्थानामधील रहिवास करणार्‍या कर्मचार्‍यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यासाठी नगरपालिका प्रशासनाने दखल घेवून कर्मचारी निवासस्थानांची दुरूस्ती करणे आवश्यक झाले आहे. यामुळे कर्मचार्‍यांना दिलासा मिळेल.