सावदा । शहरातील नगरपालिका, पंचायत समिती व कृषी विभागातील सर्व वर्ग 3 च्या कर्मचार्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर येथील कोचुर रोडवरील नगरपालिका सभागृहात झाले. उद्घाटन रावेरचे मुख्याधिकारी पी.जी.सोनवणे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सावदा येथील मुख्याधिकारी अमोल बागुल होते. यावेळी बोलताना दोन्ही मान्यवरांनी शासनाचे नियम अधिनियम, आदेश या नुसार चालते बदलत्या परिस्थितीत कालपरत्वे शासनाने केलेल्या कायद्यामध्ये अनेक महत्वपूर्ण सुधारणा होत असतात अशा बदलांचे किंवा सुधारणांचे अद्ययावत ज्ञान शासकीय कर्मचार्यांना असणे ही काळाची गरज आहे.
कर्मचार्यांचे ज्ञान कौशल्य वृद्धींगत करण्यासाठी प्रशिक्षण
यशदा पुणे व जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था जळगाव, दादासाहेब चौधरी वनप्रशिक्षण संस्था पाल, ता.रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या प्रशिक्षण शिबिरात कर्मचार्यांचे ज्ञान कौशल्य अद्यावत करण्यासाठी राज्य प्रशिक्षण धोरण शासनाने राबविले असून यात जास्तीत जास्त कर्मचार्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. शिबीरात शासनाचे खरेदी धोरण तसेच इ-निविदा प्रक्रिया, राष्ट्रीय निवृत्ती योजना यावर मार्गदर्शन देण्यात आले. यशदाचे तज्ञ प्रशिक्षक जी.टी.महाजन व एच.आर.पाटील यांनी प्रशिक्षण दिले. आतापर्यंत जळगाव, भुसावळ, अमळनेर, पाचोरा, एरंडोल आदी ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे झाली आहेत यात एक हजार 200 कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर सावदा येथे सुमारे 100 कर्मचारी उपस्थित होते. संस्थेतर्फे एक हजार 500 कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याचा मानस आहे. यशस्वीतेसाठी वन प्रशिक्षण संस्थेचे एल.बी.राणे, अशोक पवार, बी.एस.केदारे, प्रशिक्षण समन्वयक अशरफ तडवी, इरफान खान आदींनी सहकार्य केले.