नगरपालिकेच्या बदनामी प्रकरणी चौकशीची मागणी

0

सावदा। सोशल मिडीयावरील एका ग्रुपवर नगरपालिकेतर्फे मागील काही वर्षापूर्वी झालेल्या रस्त्यांच्या कामांबाबत पालिकेची बदनामी तसेच नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या विषयी विरोधी गटातील नगरसेवकांनी 2 रोजी याबाबत पालिकेत जाऊन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करा व अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करा अशा आशयाचे निवेदन सादर करण्यात आले.

संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
येथील एका सोशल मिडियावरील ग्रुपवरुन शहरात मागील काही कार्यकाळात शहरात काही रस्ते झाले. त्यांची 80 फुटाचे काम मंजूर झाले असताना प्रत्यक्षात काम मात्र 20 फुट प्रमाणे काम करण्यात आले व 80 फुटाप्रमाणे बिले निघाल्याचे प्रसिद्ध झाले. या ग्रुपवर यानंतर यात अनेकांनी चर्चेत भाग घेतला होता, सदर बाब येथील विरोधी गटातील नगरसेवकांचे निदर्शनास आल्यावर त्यांनी त्या पोस्टचे व चर्चा झालेल्या पेजचे स्क्रीनशॉट काढले व हे सर्व घेऊन त्यांनी थेट पालिका गाठली, यावेळी त्यांनी सदर ग्रुपवर पालिकेबाबत आरोप करण्यात येत असून बदनामी होत आहे. तसेच नागरिकांची देखील दिशाभूल करण्यात येत असल्याने यामागील सत्य नागरिकांसमोर यावे सदर आरोपांची पालिकेमार्फत सखोल चौकशी करावी, यात जे तात्कालीन पदाधिकारी, प्रशासन जबाबदार असतील त्यांचेवर कठोर कार्यवाही करावी तसेच पालिकेने गुन्हे दाखल करावे असे निवेदन नगराध्यक्षा अनिता येवले तसेच मुख्याधिकारी अमोल बागुल यांना देण्यात आले असून यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते फिरोजखान हबीबुल्ला खान, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे, सिद्धार्थ बडगे, किशोर बेंडाळे, यांसह विरोधी गटातील सदस्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत, दरम्यान निवेदन देतांना अपक्ष नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी हे देखील त्यांचे सोबत उपस्थित होते. त्यांनी देखील सदर बाबतीत चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.