भुसावळ। तब्बल पाच महिन्यांपासून रखडलेल्या पालिका सर्वसाधारण सभेला अखेर 22 ऑगस्टचा मुहूर्त गवसला आहे. अजेंड्यावर तब्बल 54 विकासकामांचे विषय घेण्यात आले असून अनेक निविदांना सभागृहाची मंजुरी आवश्यक असल्याने शहरात आता विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. 27 मार्च रोजी सर्वसाधारण सभा झाल्यानंतर 8 मे रोजी स्थायीची व 12 मे रोजी विशेष सभा झाल्यानंतर सर्वसाधारण सभा कधी होणार? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते.
खड्यांच्या यातनातून मिळणार मुक्ती
शहरातील अनेक वर्दळीच्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने शहरवासीयांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत होता मात्र आगामी सर्वसाधारण सभेत अनेक रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येणार असल्याने शहरवासीयांना मोठाच दिलासा मिळणार आहे.
54 विकासकामांचे प्रस्ताव
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत तब्बल 54 विकासकामांचे प्रस्ताव अजेंड्यावर घेण्यात आले आहेत. त्यात सिटी सर्वे क्रमांक 4300, 4301, 4301 ब या जागेवर पालिकेची प्रशासकीय इमारत उभारणे, शहरासाठी अॅलम व क्लोरीनची खरेदी, शहरातील हातपंपांची दुरुस्ती, पाणीपुरवठा यंत्रणेच्या पाईप लाईनची दुरुस्ती, शहरातील दुभाजकांची दुरुस्ती तसेच त्यात नवीन फुलझाडे लावणे, शहरातील रस्त्यांची डागडूजी, शहरातील विविध भागातील गटारींवर ढापे, नादुरुस्त सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे, वाहतूक नियंत्रणासाठी टोईंग वाहन खरेदी करणे, पांडुरंग टॉकीज चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणार्या चौकाचे सुशोभीकरण करून जागा कमी करणे यासह विविध विकासकामांचा समावेश आहे.
शहर विकासाच्या विषयांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असून लवकरच शहरात विकासकामे सुरू होताना दिसतील. निविदा प्रक्रियेमुळे काही कामे सुरू करण्यास दिरंगाई झाली मात्र आता विकासाची घौडदौड सुरू झाली आहे. शहरातील पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागला असून रहिवासी वस्तीत तब्बल 1500 पथदिवे सुरू करण्यात आले.
रमण भोळे, नगराध्यक्ष, भुसावळ नगरपालिका