नागपूर : पहिल्या तीन टप्प्याप्रमाणे नगरपालिका निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातही भारतीय जनता पक्षाने जोरदार कामगिरी केली असून विदर्भात फडणवीस आणि गडकरी यांची पकड मजबूत असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रातील 212 नगरपालिका निवडणुकीतील अखेरचा आणि चौथ्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. यात नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील 11 नगरपालिकांचा समावेश होता.
आज झाली मतमोजणी
आज सकाळपासूनच मतमोजणीस सुरवात झाली. मागील तीन टप्प्यातील निवडणूक निकालाप्रमाणेच याही ठिकाणी भाजपनेच बाजी मारली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकील्यात त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दोघांनीही भाजपच्या उमेदवारांसाठी जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या होत्या. नागपूर जिल्ह्यातील 9 पालिका अध्यक्ष आणि 186 सदस्यांच्या निवडीसाठी रविवारी जिल्ह्यात 70 टक्क्यांवर मतदान झाले होते. 11 पैकी 7 ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले असून 2 ठिकाणी स्थानिक आघाडी आणि 2 ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली आहे. यातील रामटेकमधील विजय हा विशेष लक्षणीय ठरला आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक नगरपरिषदेवर फडकणारा शिवसेनेचा झेंडा उतरवून आज भाजपनं आपल्या सहकारी पक्षाला जोरदार झटका दिला आहे. 17 पैकी 13 जागा जिंकून भाजपनं रामटेकमध्ये सत्ता मिळवली आहे, तर शिवसेनेच्या पदरी फक्त दोन जागा पडल्यात. तसंच, काँग्रेसलाही फक्त दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
अणेंच्या पक्षालाही यश
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी निवडणूकित उतरलेल्या अणेंच्या विदर्भ माझा पक्षाने काटोल पालिकेत 10 जागांवर विजय मिळवून झोकात सुरूवात केली आहे. तर चार जागांवर शेकापचे उमेदवार विजयी झाले आहेत. अध्यक्षपदासाठी विदर्भ माझाच्या वैशाली ठाकूर यांनी विजय मिळवला आहे. भाजपा आणि शिवसेनासह इतर कोणत्याच पक्षाला खातं उघडता आलं नाही.