नगरपालिकेत स्वच्छतेवर खडाजंगी

0

शहादा । येथे आज रोजी दुपारी 4 वाजता नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष मोतीलाल पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली एकूण 42 विषय चर्चेसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी व्यापारी संकुलाची मुदत बाबतचा विषय तहकुब करण्यात आला असुन उर्वरित सर्व विषयांना मंजुरी देण्यात आले. तर स्वच्छतेचा विषयावर सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली.

नगरसेवकांमध्ये भेदभाव नाही
नगरसेवक मकरंद पाटील यांनी वेगवेगळ्या प्रश्‍नामध्ये चर्चेत भाग घेऊन साफ सफाईचा ठेक्याला वाढीव मुदत द्यायची नाही असा विषय पारित केला. मकरंद पाटील यांनी सभेत समन्वयाची भुमिका पार पाडली. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी नगरसेवकांनी चुकीचे आरोप करु नये , शहरात विकास कामे होत आहेत. कोणत्याही नगरसेवकांचा कामाबाबत भेदभाव केला जात नाही. विकास कामांना साथ द्यावी असे आवाहन केले. मुख्याधिकार्‍यांनी तांत्रिक प्रश्‍नांची उत्तरे दिलीत. विषयांचे वाचन कार्यालयीन अधिक्षक गजेंद्र सावरे यांनी केले. सभेत नगरसेविका उषाताई कुवर , योगिता वाल्हे , वाजीद पिंजारी , प्रशांत निकम , लक्ष्मण बढे यांनी चर्चेत
भाग घेतला.

विविध विषयांवर चर्चा
सभेला मुख्याधिकारी राहुल वाघ , विरोधी गटाचे नेते नगरसेवक मकरंद पाटील , उपनगराध्यक्षा रेखाबाइ चौधरी सह एकुण 24 नगरसेवक उपस्थित होते. शहरातील विविध रस्त्यांची कामे , डांबरीकरण , गटारींचे कामे करणे, पालिकेचा मालकीचा जागा विकसित करणे, नगरपालिका शाळा क्रमांक 2 , गरीब नवाज कॉलनीत स्थलांतरित करणे, शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी मडपंप खरेदी करणे, अवैध नळ कनेक्शन शोध घेणे यासह इतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली .

कर भरणार्‍यां वसाहतींकडे दुर्लक्ष
शहरात स्वच्छता केली जात नाही. सर्वत्र घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे, तक्रारी ऐकल्या जात नाही , स्वच्छता मिशन केवळ नावाला असल्याचा आरोप नगरसेविका उषाताई कुवर यांनी केला. प्रभाग क्रमांक 12 मध्ये साफ सफाई केली जात नाही, झाडु मारला जात नाही. दहा दिवसात घंटा गाडी येते असा आरोप नगरसेवक प्रशांत निकम यानी करुन लेखी जाब विचारला. 100% पालिकाकर भरणार्‍या वसाहती दुर्लक्षित झाल्या आहेत असाही आरोप नगरसेवक निकम यांनी केला.