पुणे (सोनिया नागरे) । जीवन हे नश्वर आहे. अर्थातच अध्यआत्म सांगते शरीर मृत झाले तरी आत्मा जागृत राहतो. मात्र हेच नश्वर शरीरसुद्धा मृत्युपश्चात्त कोणाला जीवनदान देऊ शकते. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे अवयवदानातून अनेकांचे प्राण वाचवता येणे सहज शक्य झाले आहे. अजिंक्य नाईकवाडे हा तरुण अपघातात दगावला. परंतु त्याने केलेल्या अवयवदानामुळे आज तो गरजूंच्या रूपाने जीवंतच असल्याचे समाधान त्याच्या कुटुंबीयांनी ‘जनशक्ति’शी बोलतांना व्यक्त केले.
अहमदनगर येथील सावेडी परिसरातील रहिवासी असलेला अजिंक्य अनिल नाईकवाडे (25) हा दुचाकीवरुन जात असताना विरुद्ध दिशेने येणार्या भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अजिंक्यला तातडीने स्थानिक रुग्णालयात हलविले. परंतू अधिक उपचारासाठी त्याला पूढे पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले औषधोपचार सुरु असतांना 25 एप्रिल रोजी त्याची प्राण ज्योत मालवली.
अजिंक्यने एमबीए करून स्वतःचा पुस्तकालायाचा व्यवसाय सुरु केला होता. अतिशय मनमिळावू स्वभाव तसेच समाजकार्याची आवड ही त्याला होती. यातूनच त्याने नेत्रदानाचा संकल्प देखिल केला होता. लवकरच बँकिंग क्षेत्रात पदार्पण करण्याचा त्याचा मानस होता. परंतु त्याच्या स्वप्नांवर काळ आडवा आला. मात्र त्याच्या स्वप्नांतून अनेकांना जीवनदान देण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला. यासाठी रुग्णालयातील अवयवदान विभागाशी कुटुंबीयांनी अजिंक्यची इच्छा विषद केली असता त्यांना अवयव दानाचे महत्व समजावून सांगण्यात आले. अजिंक्यच्या कुटुंबियांच्या या धाडसी निर्णयामुळे आज कित्येक रुग्णांना जीवनदान प्राप्त झाले आहे.
कुणाच्या तरी रुपात जीवंत
अजिंक्यचे हृदय, स्वादुपिंड, यकृत, मूत्रपिंड, कॉर्निया आदी अवयवदान स्वरुपात अनेकांची जीवनज्योत फूलत राहणार आहे. कुणाच्या तरी शरीरात त्याचे हृदय, कुणाच्या तरी शरीतरात त्याचे डोळे, यातून तो या जगात वावरत राहणार आहे. कुणाच्या तरी रूपात तो जिवंतच असणार असल्याची भावना कुटूंबीय, मित्र, स्नेहयांनी व्यक्त केली. अवयदानाची देशात मोठ्या प्रमाणावर गरज असून यामूळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते. परंतू अवयवदानाबाबत अद्याप समाजात पाहिजे तेवढी जागृती झालेली नसल्यामुळे आजही कित्येक गरजवंत अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. जिंक्यसारखा अवयवदानाचा धाडसी संकल्प तुम्हामाझ्यासारख्या अनेकांनी केल्यास नक्कीच अशा रुग्णांना नवसंजीवनी मिळेल. तेंव्हा देशातील अपघातांची वाढती संख्या पाहता प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प केल्यास मृत्युदर आटोक्यात आणता येईल.
अवयवदान काळाची गरज आहे. एका व्यक्तीने जरी अवयवदान केली तरी 8 ते 10 लोकांचे प्राण वाचू शकतील. यासाठी तरुणांना प्रोत्साहन द्यायला हवे. अवयवदानामुळे अनेक कुटूंबांमध्ये आनंदाचे क्षण परत येण्यास मदत होईल तसेच कुणाच्या तरी रूपात आपल्या जवळची व्यक्ती या जगात आहे. याचे आत्मिक समाधानदेखिल मिळेल.
– डॉ. चंद्रशेखर जंगम, एम. डी.,
विभागप्रमुख अॅनॉटॉमी मेडिकल कॉलेज, अहमदनगर