नगरमधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सापडला

0

देहूगावात सोनसाखळी चोरताना पकडले

देहूगावः नगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस ठाण्यातील एका खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपी देहूगाव येथे एका वारकर्‍याच्या गळ्यातील सोनसाखळी चोरताना पकडला. ही घटना शुक्रवारी (दि. 6) दुपारी साडेबाराच्या सुमारास देहूगावातील माळवाडी येथे घडली. शंकर शिवाजी पवार (वय 21) आणि महेंद्र सुरेश आरगडे (वय 24, दोघे रा. माणिक दौंडीरोड, पाथर्डी, जि. अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाच्यावेळी एका 60 वर्षीय वारकर्‍याच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी शंकर आणि महेंद्र या दोघांनी चोरली. पोलिसांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे आणि बंदोबस्तातील पोलिसांच्या ही बाब निदर्शनास येताच तात्काळ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेली सोन्याची साखळी पोलिसांनी जप्त केली.

स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता ते नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे समोर आले. पाथर्डी पोलीस ठाण्यात मागील वर्षी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुन्ह्यात शंकर आणि महेंद्र हे दोन आरोपी होते. त्यातील शंकर याला पाथर्डी पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. त्यानंतर तो जामिनावर सुटला होता. मात्र महेंद्र अजूनही पोलिसांनी हाती लागला नव्हता. पोलिसांनी त्याला फरार म्हणून घोषित केले होते. शुक्रवारी संत तुकाराम महाराज पालखी पिंपरी-चिंचवडच्या दिशेने प्रस्थान ठेवत असताना या दोघांनी मिळून सोनसाखळी चोरण्याचा प्रताप केला आणि पोलिसांच्या हाती आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खुणे, पाटील, पोलीस हवालदार लिमन, वाघमारे, पोलीस नाईक महाडिक, यांच्या पथकाने केली.