नगरमध्ये विखेंचा धक्कातंत्र ; नवनियुक्त कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा !

0

उद्या राहुल गांधींची सभा; तत्पूर्वी जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने गोची

अहमदनगर: नगर जिल्हा हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र आता नगर जिल्ह्यात कॉंग्रेसला घर-घर लागली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे देखील कॉंग्रेसमध्ये सक्रीय नाही. त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविली. दरम्यान आता काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी संगमनेरला सभा आहे. त्यापूर्वीच ससाणे यांनी आपला राजीनामा दिल्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाने दिलेला हा मोठा दणका मानला जात आहे.

श्रीरामपूरमध्ये बुधवारी झालेल्या बैठकीनंतर आज ससाणे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली. आपण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असून अद्याप काँग्रेस पक्ष सोडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरची निवडणूक संपल्यानंतर विरोधी पक्ष नेते विखे यांनी शिर्डी मतदारसंघात लक्ष घालायला सुरवात केली आहे. त्याचा परिणाम आता दिसू लागले आहेत. डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी विखेंसोबत जाण्याची भूमिका घेतल्याने त्यांना पदावरून दूर करीत ससाणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये माजी मंत्री थोरात यांचा पुढाकार होता. ससाणे मूळचे विखे सर्मथक असले तरी त्यांची नियुक्ती थोरातांच्या पुढाकारातून झाली होती. त्यानंतर ते पक्षात आणि आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारात सक्रीय झाले होते. मात्र, कांबळे यांच्याच एका वक्तव्यामुळे नाराजी झाल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीरामपूरला युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी प्रचार सभा घेण्यासाठी येत आहे. त्यामुळे आता शनिवारी ससाणे आणि विखे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.