नगरसेवकांच्या लवाजम्यावर आवर घालणार

0

कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेत महासभेच्या दिवशी येणाऱ्या नगरसेवकसमर्थकांच्या लवाजम्याला आवर घालण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. यापुढे नगरसेवकांचा फौजफाटा पालिकेच्या प्रवेशद्वारावरच रोखला जाणार असून नगरसेवकासमवेत केवळ एका स्वीय सहाय्यकालाच पालिका मुख्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. शनिवारी कुणाल पाटील आणि महेश गायकवाड या दोन नगरसेवक समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी हे आदेश दिले आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शनिवारी दोन नगरसेवकांचे समर्थक आपापसांत भिडल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करत या नगरसेवक समर्थकांना सोडवावे लागले होते. यापूर्वी महासभेदरम्यान नगरसेवक समर्थक आपसात भिडण्याचे प्रकार सलग पाचवेळा घडले असून शनिवारी पुन्हा त्याची पुनरावृत्ती होताच पोलिसांनी नगरसेवकांना पोलिसी खाक्या दाखवला. मात्र केवळ मुख्यालयाच्या आवारातच नव्हे तर लोकप्रतिनिधी इमारतीच्या पहिल्या मजल्यापासून ते चौथ्या मजल्यापर्यंतच्या जिन्यावर नगरसेवकसमर्थक गर्दी करून उभे राहत असल्यामुळे तब्बल ६७ नगरसेविका आणि पालिकेतील महिला कर्मचारी यांना या घोळक्यातून रस्ता काढत महासभेच्या सभागृहात पोहोचणे कठीण होते. सुरक्षा रक्षकांनी या समर्थकांना रोखण्याचा प्रयत्न केल्यास नगरसेवक सुरक्षारक्षकांशी वाद घालतात. यामुळे जिन्यावरील या कार्यकर्त्यांचा घोळका रोखला जावा, अशी मागणी महिला नगरसेविकांकडून अनेकदा करण्यात आली आहे. या सर्व सूचनांची शनिवारच्या घटनेनंतर पालिका प्रशासनानेदेखील गंभीर दखल घेत पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. शनिवारी घडलेल्या घटनेमुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेची नाचक्की झाल्यानंतर आता पालिकेतील जुन्या जाणत्या नगरसेवकांनीदेखील पालिका मुख्यालयाच्या आवारात नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. प्रवेशद्वारावर महासभेसाठी येणाऱ्या नगरसेवकाला पास देत पासधारकांनाच प्रवेश देण्याची मागणीदेखील नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

या सर्व सूचनांची दखल घेत पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पालिका मुख्यालयाच्या आवारात नगरसेवक आणि त्यांच्या एका स्वीय सहाय्यकालाच सोडण्याचे आदेश दिले असून या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी पालिका प्रशासनाने सहकार्य करावे, अशा सुचनाही पालिका आयुक्तांना दिल्या आहेत.