नागरिकांच्या अपेक्षा ठरल्या फोल
पिंपरी (बापु जगदाळे) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सत्ता बदलाला एक वर्ष उलटून गेले तरी नवनिर्वाचित नगरसेवकांना विकासकामांचा सूर अद्याप गवसलेला नाही. विकासकामांकडे दुर्लक्ष आणि चमकोगिरीकडेच लक्ष देणार्या नगरसेवकांची गाडी रूळावर कधी येणार आणि शहराचा विकास कधी होणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. यामुळे मात्र महापालिकेतील व्यावसायिक नगरसेवकांचीच चलती असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अनेक नागरी प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे नागरिकांची अपेक्षा फोल ठरली आहे.
विश्वासाला एका वर्षातच तडा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गेली पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. या काळात शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मात्र असे असले तरी जनतेने गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात मतांचे दान टाकले. त्यामुळे सत्ता बदल घडवून आणला. महापालिकेतील भाजपा सत्तेला एक वर्ष होऊन गेले असले तरी विकासाची गती मात्र मंदावलेली दिसत आहे. राज्यात आणि केंद्रातही भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे शहराचा विकास अधिक गतीने होईल, ही येथील जनतेची अपेक्षा होती. मात्र ज्या विश्वासाने जनतेनं भाजपाला निवडून दिले त्या विश्वासाला एका वर्षातच तडा गेल्याचे बोलले जात आहे. शहरातील अनेक मुख्य व महत्वाचे प्रश्न जैसेथेच असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यांचा रोख हा शास्ती करा बाबत असुन अद्यापही शास्ती कर माफ झाला नाही त्यामुळे अनेक अनाधिकृत बांधकामे अधिकृतच्या प्रतिक्षेत आहेत.
ज्येष्ठ नगरसेवकच कार्यशील
वर्षभरापूर्वीच्या झालेल्या निवडणुकीत जनतेने अनेक नव्या चेहर्यांना निवडून दिले. नवीन उमेदवार, नव्या जोमाचे नगरसेवक असतील तर शहर विकासाला गतिमान करतील, ही नागरिकांना अपेक्षा होती. मात्र येथेही नागरिकांची निराशा झाली. चुकीची कामे करण्यातच ते धन्यता मानताना दिसत आहेत. नव्या नगरसेवकांनी जनतेची घोर निराशा केली आहे. मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अनुभवी नगरसेवक विकासकामांसाठी कार्यशील असल्याचे पाहायला मिळत आहे. पण त्यांची देखील कार्यशिलता संशयाच्या भोवर्यात नेहमीच असते.
नगरसेवक केवळ आदेशाचे पालनकर्ते
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. राज्यात आणि केंद्रातही भाजपाचेच सरकार आहे. त्यामुळे शहराचा विकास अधिक गतीने होईल, आपला प्रभाग स्मार्ट बनविण्यासाठी नगरसेवक धडाडीने काम करतील, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, खासदार आणि आमदारांनी सांगितल्याशिवाय कोणतेच काम होताना दिसत नाही. किंवा तसे त्यांना सांगितले जाते अशीही दबक्या आवाजात चर्चा असते. त्यामुळे ज्यांनी जनतेची कामे करायची ते नगरसेवक खासदार, आमदारांच्या आदेशाचे पालनकर्ते झालेत आहेत का, असा सवाल नागरीकातून उपस्थित होत आहे.
भानावर येण्याची गरज
अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ म्हणाले की, भाजपाचे नगरसेवक स्वत:च्याच धुंदीत असून त्यांना विकासकामांबाबत काहीच देणेघेणे नाही. चमकोगिरी करणार्या नगरसेवकांनी भानावर येण्याची गरज आहे. सत्तेचा उपयोग विकासासाठी होणे अपेक्षित आहे. पण तो होताना दिसत नाही. अनेक भागात पाण्याची बीकट समस्या आहे. समाविष्ट गावांबाबत मोठे राजकारण केलं जातय. निधीचे समांतर वाटप नाही. अनावश्यक खर्च टाळण्याचा दिखाऊपणा केला जातो उदयोजकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जात नाही.