नगरसेवकांना सुविधा तर सर्वसामान्य नागरिकांना का नाही?

0

प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांनी व्यक्त केला रोष;खुल्या भूखंडावर घाणीचे साम्राज्य

जळगाव– प्रभाग क्रमांक 1 मधील दांडेकर नगर,दुध फेडरेशन,राधाकृष्ण नगर,लाकुडपेठ,खडकेचाळ,इंद्रप्रस्थनगर परिसरात दैनिक जनशक्तिच्या टीमने पाहणी करुन नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्या. नागरी मुलभूत सुविधा मिळत नसल्याने येथील नागरिकांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या नाकर्तेपणावर तीव्र संताप व्यक्त केला.
परिसरात साफसफाई होत नाही.गटर साफ केली जात नाही.पथदिवे बंद आहेत.पाणी पुरवठा नियमित होत नाही.वीजेच्या तारा लोंबकळल्या आहेत,अशा विविध सुविधांची वानवा असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. मनपातर्फे परिसरातील नगरसेवकांना सुविधा पुरविल्या जातात तर मग सर्वसामान्य नागरिकांना सुविधा का? दिल्या जात नाही असा संतप्त सवाल उपस्थित करुन नगरसेवकांविरुध्द रोष व्यक्त केला.

साफसफाईचा अभाव

साफसफाईसाठी मनपाने ठेका दिला आहे.तरीही देखील साफसफाई होताना दिसत नाही.साफसफाई होत नसल्याने ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे.परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात बर्‍याच खुल्या जागा आहेत. खुल्या जांगावर झाडेझुडपे वाढलेली आहेत. सांडपाण्याची डबकी साचले आहेत.त्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. डेंग्यू सारखे साथीचे आजार होत असतांनाही फवारणी केली जात नाही.वारंवार तक्रारी करुन देखील प्रशासन दखल घेत नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

लोंबकळलेल्या वीज तारांचा धोका

प्रभाग 1 मध्ये विजेच्या तारा लोंबकळल्या असल्याने धोका निर्माण झाला आहे. घराच्या गच्चीवर जाताना अक्षरश: जीव मुठीत टाकून जावे लागते.यासंदर्भात अनेकदा तक्रारी केल्या आहेत.मात्र प्रशासनाकडून कार्यवाही केली जात नाही. पथदिवेही बंद आहेत.त्यामुळे परिसरात अंधारात असतो.त्यामुळे चोरीचे प्रमाण देखील वाढले असल्याचे नागरिकांनी सांगितले. वाहतुकीला अडथळा ठरत असलेला इंद्रप्रस्थनगरातील वीजेचा खांब स्थलांतरीत करावा यासाठी निवेदन देवूनही स्थलांतरीत करण्यात आलेला नाही.

अनियमित पाणीपुरवठा

मनपातर्फे करण्यात येत असलेला पाणी पुरवठा अनियमित होतो.नियोजित वेळेत कधीही पाणीपुरवठा होत नाही. रात्री-बेरात्री पाणी पुरवठा होत असल्याने त्रास होत असल्याचा संताप येथील महिलांनी केला. पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी देखील केली.

नगरसेवकांविरुध्द रोष

निवडणुका आल्या की,मत मागायला येतात. मात्र निवडूण आल्यानंतर परिसरात फिरकत देखील नाही.एखादी समस्या घेवून नगरसेवकांकडे गेल्यानंतर हो हो म्हणात परंतु समस्या सोडवित नाही. कधीही समस्या जाणून घेत नाही.समस्या सोडविण्यात असमर्थ असल्याचा आरोप करत नागरिकांनी नगरसेवकांविरुध्द रोष व्यक्त केला. नगरसेवकांच्या घरासमोरील परिसरात सोयी सुविधा पुरविल्या जातात.त्यांच्या घरासमोर लाईट असतात,गटारींची स्वच्छता केली जाते.साफसफाई केली जाते.मात्र सामान्य नागरिक राहत असलेल्या परिसरात मनपाचे कर्मचारी फिरकत सुध्दा नसल्याचे नागरिकांनी सांगितले.