नगरसेवकांनी ठोकले नगरपरिषदेच्या सभागृहाला टाळे

0

यवत । दौंड शहरातील झालेली रस्त्यांची दुरावस्था, दुषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व कचर्‍याच्या विल्हेवाटीच्या गंभीर प्रश्‍नाबाबत निश्‍चित उपाययोजना कधी करणार याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी यांच्यासह राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी दौंड नगरपरिषदेच्या टाऊन हॉलमधील अस्थायी कार्यालयाला बुधवारी (दि.15) टाळे ठोकून काम बंद आंदोलन केले.

दौंड शहरामधील सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांना पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे चालक, नागरिक हैराण झाले आहेत. तसेच शहराला होणारा दूषित पाणी पुरवठा व कचर्‍याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारामुळे विद्यमान उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांना नाईलाजास्तव कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन करावे लागले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी दीड महिन्यात सुधारणा करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक इंद्रजित जगदाळे, बादशाह शेख, नगरसेवक गौतम साळवे, अनिता दळवी, प्रणोती चलवादी, संजय चितारे, राजेश जाधव, ज्योती राऊत या आंदोलनात सहभागी झाले होते.