नगरसेवकांनी पनवेल आयुक्तांना धरले धारेवर

0

नवी मुंबई । पनवेल महापालिकेची शनिवारची सभा वादळी ठरणार, अशी महासभेपूर्वी सुरू असलेली चर्चा शनिवारी झालेल्या महासभेदरम्यान खरी ठरली आहे. महासभेत प्रशासनाचा अधिकारी वेळेत उपस्थित नसणे, महापौरांनी कर्मचार्‍याला निलंबित करण्याचे आदेश देऊन प्रशासनाकडून कारवाई न होणे, अशी कारणे देत प्रशासनाचा निषेध करत महासभा तहकूब करण्यात आली. सुरुवातीला आयुक्त नसल्यामुळे तहकूब झालेली सभा दुसर्‍यांदा पुन्हा थेट 21 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली गेली. महापालिका आयुक्तांची बदली होणार, या चर्चेमुळे पनवेल महापालिकेच्या या महिन्याच्या सभेत गोंधळ होणार, अशी चर्चा सभेच्या आयोजनापासून सुरू होती. फडके नाट्यगृहात ठरल्याप्रमाणे 11 वाजता सभेच्या ठिकाणी महापौर आणि अन्य उपस्थित होते. मात्र, महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे किंवा त्यांच्या जागी कोणीही पर्यायी अधिकारी उपस्थित नव्हता.

सूचना न देता सभेला गैरहजर
सभागृहात उपायुक्त संध्या बावनकुळे आल्यानंतर सभेला सुरुवात झाली. अभिनंदनाचे ठराव, निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली. सुरुवातीलाच सत्ताधार्‍यांकडून गतवेळच्या सभेत खारघरचे अधीक्षक श्रीराम हजारे यांच्यावर कारवाई का झाली नाही, महापौरांनी निलंबनाचे आदेश दिले होते, प्रशासनाने त्यांच्यावर काय कारवाई केली?, असा प्रश्‍न सत्ताधारी नगरसेवकांनी विचारला असता बावनकुळे यांनी ’कारवाई करण्यात येईल’, असे उत्तर दिले. आदेश देऊन महिना उलटला तरी कारवाई झाली नाही, असे प्रत्युत्तर आल्यानंतर बावनकुळे यांनी ’दहा मिनिटांत आयुक्त येणार आहेत’, असे उत्तर दिले असता मग सभा आयुक्त आल्यानंतर सुरू होईल म्हणून तहकूब करण्यात आली. 35 मिनिटांनंतर आयुक्त आल्यानंतर सभेला पुन्हा सुरुवात झाली. महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी ’आयुक्त मला कोणतीही सूचना न देता सभेला गैरहजर राहतात. 11 वाजताच्या सभेला अधिकारी नसल्यामुळे उशीर होतो,’ यावर बोट ठेवले. गतवेळची सभादेखील वेळेत सुरू होऊ शकली नव्हती, असेही सांगितले.

हजारे यांच्यावर कारवाई नाही
नगरसेवक संतोष शेट्टी यांनी थेट आयुक्तांना उद्देशून तुम्ही स्वत:ला बॉस समजता का, असे विचारताच गोंधळाला सुरुवात झाली. आयुक्त सभेला उपस्थित राहणार नाहीत, याबाबत महापौरांना पूर्वसूचना देण्यास त्यांना कमीपणा वाटतो का?, असा प्रश्‍न विचारला. आयुक्तांनी ’सभागृहाचा आम्ही आदर राखतो, उपायुक्तांकडून सभेस यायला उशीर झाला असल्यास त्यांना कारण विचारतो’, असे सांगितले. श्रीराम हजारे यांच्यावर आदेश देऊनही कारवाई का झाली नाही, त्यांची चौकशी झाली का, यावरून सत्ताधार्‍यांनी प्रशासनाला लक्ष्य केले. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ’हजारे यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत सभा चालणार नाही’ अशी घोषणा केली. महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर यांनी महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी यांच्याविरोधात आलेल्या पत्राचा गौप्यस्फोट महापालिकेत केल्यानंतर महापौरांनी सभा 21 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्याचे आदेश दिले. विरोधकांनी सत्ताधार्‍यांचा निषेध केला, सभा रद्द करू नका, आम्ही सभा चालवू असे आवाहन केले. मात्र, गोंधळातच राष्ट्रगीत सुरू झाले आणि सभा संपली. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सभागृहात प्रशासनाला चांगलेच लक्ष्य केले. शहरात एकही काम होत नाही, प्रशासनाने पनवेलचा कचरा केला. कामचुकार अधिकार्‍यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत सभा चालवायची नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.