नगरसेवकांनी शिविगाळ केल्याचा आरोप

0

धुळे । महापालिकेत कोणत्या कारणांवरून नगरसेवक आणि आधिकारी कर्मचारी वाद होईल याचा नेम नाही. जिल्हा नगरोत्थान योजनेत प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांच्या तांत्रिक मंजूरीवरून मनपाचे कार्यकारी अभियंता बी .जी.भोई यांना शिवसेनेचे नगरसेवक संजय गुजराथी यांनी शिविगाळ केल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 : 30 वाजता घडली. या घटनेनंतर संतप्त होत दुपारी अधिकार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते.

नगरसेवकांचा जाब विचारल्याचा खुलासा
महापालिकेचे कार्यकारी अभियंता बी.जी.भोई यांच्याकडे जिल्हा नगरोत्थान योजनेतील कामांची फाईल प्रशासकीय मंजूरीसाठी सादर करण्यात आली होती. मात्र त्यांनी संबंधित फाईलला महासभेच्या ठरावाची प्रत जोडण्यास सांगितले. प्रत जोडल्यानंतरही काही त्रुटी सुचविण्यात आल्याने नगरसेवक संजय गुजराथी व कार्यकारी अभियंता बी.जी.भोई यांच्यात सकाळी 11:30 वाजता शाब्दिक वाद झाला. त्यानंतर दुपारी भोई यांनी त्याबाबतची तक्रार आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली. त्यानंतर अधिकार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारले. सर्व अधिकार्‍यांनी हाताला काळी फित बांधून आयुक्तांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे नगरसेवक संजय गुजराथी यांनी मात्र आपण भोई यांना शिविगाळ केली नसून केवळ जाब विचारल्याचे सांगितले. आपल्या प्रभागातील रस्त्यांची कामे नगरोत्थान योजनेंतर्गत सादर केली असून ती कामे मार्गी लावण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप संजय गुजराती यांनी केला.