पुणे । दैनंदिन कामाच्या धावपळीत नगरसेवकांना आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे हे दुर्लक्ष जीवावर बेतण्याचीही शक्यता असते. महापालिकेच्या सर्व विद्यमान नगरसेवकांनी तातडीने कॅन्सर तसेच हृदयाशी संबधित प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या करून घेण्याचे पत्र पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व सदस्यांना दिले आहे. त्यासाठीची सुविधा कर्वे रस्त्यावरील सह्याद्री रूग्णालय तसेच रूबी हॉल क्लिनिकमध्ये करण्यात आली असून सदस्यांनी लवकरात लवकर या तपासण्या करून घ्याव्यात, असे आवाहन या पत्रात करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी दिली. मागील आठवड्यात माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका चंचला कोद्रे यांचे हृदयविकाराने निधन झाले. तसेच काही सदस्यांवर वेगवेगळया रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून सदस्यांसाठी तातडीने या तपासण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
नगरसेवकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
गेल्या वर्षभरात महापालिकेच्या दोन विद्यमान नगरसेवकांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रभागातील कामकाज तसेच नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी वर्षातील सर्व दिवस 24 तास नागरिकांसाठी उपलब्ध राहावे लागत असल्याने अनेकदा आहार तसेच व्यायामाकडे त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होते. परिणामी नगरसेवकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, कामाचा ताण तसेच तणावजन्य स्थितीमुळे त्यांच्या मानसिकतेवरही त्याचा परिणाम होतो. परिणामी नगरसेवकांना वेगवेगळया आजारांचा सामना करावा लागत आहे. तसेच नगसेवकांमध्ये अनेकदा चिडचिडचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दैनदिन जीवनशैली मुळे नगरसेवकांच्या आरोग्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे.
धावपळीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष
या वर्षभरात महापालिकेचे तत्कालीन विद्यमान उपमहापौर नवनाथ कांबळे आणि विद्यमान नगरसेविका आणि माजी महापौर चंचला कोद्रे यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. या दोन्ही सदस्यांना श्रध्दांजली वाहताना सर्वपक्षीय नगरसेवकांकडून आपल्या कामाचे स्वरूप तसेच धावपळीमुळे आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे आपणच आपली काळजी घ्यावी, असे आवाहन एकमेकांना करण्यात आले होते. तसेच कामाचा ताण न घेता दैनंदिन कामकाज सांभाळण्याच्या सूचनाही एकमेकांना करण्यात येत आहेत. मात्र, या दोन्ही सदस्यांच्या अकस्मित जाण्याने सर्वपक्षीय सदस्यांमध्ये आरोग्याबाबत भीतीचे वातावरण असल्याचे चित्र आहे.
तपासण्या तातडीने करण्याचे आदेश
आरोग्य विभागाकडून सदस्यांसाठी कॅन्सर आणि ह्रदयाशी संबधित वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येणार आहे. त्यात तणाव चाचणी, 2 डी इको, ईसीजी अशा वेगवेगळ्या तपासण्यांचा समावेश आहे. त्यासाठी डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालय तसेच पुणे स्टेशन जवळील रूबी हॉल क्लिनिकमध्ये तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तपासण्या तातडीने करून घेण्याची विनंतीही या पत्रात आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.
दोन रुग्णालयांमध्ये सुविधा
माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनानंतर महापालिका आयुक्तांनी सर्वपक्षीय सदस्यांच्या आरोग्य तपासण्या करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, दोन रूग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून पुढील आठ दिवसांत तपासण्या करून घेण्याचे आवाहन सर्व सदस्यांना पत्राद्वारे करण्यात आले आहे.
– डॉ. अंजली साबणे, सहायक आरोग्य प्रमुख