नगरसेवकांमार्फत स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीला गती

0

नवी मुंबई । स्वच्छ सर्वेक्षण 2018 ला सामोरे जात देशात स्वच्छतेत असलेला आठवा नंबर पहिला करण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवून सर्वजण एकत्रितपणे काम करत असून या कामाची गती वाढविण्यासाठी आज लोकप्रतिनिधींची बैठक बोलविण्यात आल्याचे नमुद करीत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी नगरसेवकांच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेश त्यांच्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करावेत असे आवाहन केले. नगरसेवकांनी आपल्या प्रभागात फिरून नागरिकांच्या समुहांशी संवाद साधावा व त्यांना सर्वेक्षणाच्या अनुषंगाने विचारल्या जाणा-या स्वच्छता विषयक प्रश्‍नांची माहिती द्यावी व शहरात स्वच्छतेमध्ये झालेल्या बदलाचीही माहिती द्यावी असे महापौरांनी सांगितले. स्वच्छ भारत मिशनचे संचालक व्ही.के. जिंदाल यांनी नवी मुंबई भेटीप्रसंगी येथील स्वच्छता कामांची प्रशंसा करताना लोकप्रतिनिधी व प्रशासन यामध्ये नवी मुंबईत चांगला संवाद असल्यामुळे उत्तम काम होत असल्याचे अभिप्राय दिला असून याव्दारे स्वच्छ सर्वेक्षण कामाला एकत्रितपणे अधिक गती मिळेल असा विश्‍वास महापौर जयवंत सुतार यांनी व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्र सभागृहात स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या अनुषंगाने आयोजित नगरसेवकांच्या विशेष बैठकीप्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त केलेे.

माहिती प्रसारणात भूमिका बजवावी
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी जनतेशी थेट संपर्क साधण्यात नगरसेवकांची भूमिका महत्वाची असून सर्वच नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील नागरिकांशी स्वच्छ सर्वेक्षणाविषयी माहिती प्रसारणात महत्वाची भूमिका बजवावी असे आवाहन केले. नगरसेवकांच्या स्वच्छतेविषयी आवाहन करणा-या ध्वनीचित्रफिती बनविण्यात आल्या असून त्यासोशल मिडियाव्दारे नगरसेवकांमार्फत प्रसारित करण्यात आल्या आहेत. यापुढील काळात नगरसेवकांनी सोसायटी, कंडोनियम, वस्त्या यामध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांना स्वच्छतेविषयी प्रश्‍नांची माहिती द्यावी असे आवाहन आयुक्तांनी केले. स्वच्छता ही सर्वेक्षणासाठी महत्वाची आहेच मात्र ती यापुढील काळात कायमस्वरुपी ठेवून स्वच्छतेची संस्कृती रुजविण्यासाठी सर्वांनी आपले कर्तव्य समजून हातभार लावावा असे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सांगितले.