नगरसेवकाचा वाढदिवस अग्निशमन दलासोबत

0

कल्याण । ठाणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि भाजप नगरसेवक तथा गटनेते वरुण पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांची सदिच्छा भेट घेत आपल्या वाढदिवस साजरा केला. गेल्या 30 ते 35 वर्षांत राजकीय नेत्यांनी किंवा पदाधिकार्‍यांनी आमची सदिच्छा भेट घेत वाढदिवस साजरा केला नाही. हा वाढदिवस वेगळा अनुभव आज अनुभवायला मिळाला असल्याचे मनोगत यावेळी कर्मचार्‍यांनी व्यक्त केले.आधारवाडी प्रभागात डम्पिंग ग्राउंड असून या डम्पिंगवर वारंवार आग लागण्याचे प्रकार घडतात. त्यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि अधिकारी तत्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थती पूर्ववत करण्याचे काम करतात. डम्पिंगचा घाणेरडा वास आणि आगीतील धूर या सर्वांना सामोरे जाऊन ते आपले काम करत असतात. त्याचबरोबर शहरातील इतर ठिकाणीदेखील तत्काळ पोहोचतात. त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. त्यामुळे आज वाढदिवसाचे औचित्य साधत आधारवाडी येथे असलेल्या अग्निशमन दलाच्या कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकार्‍याची सदिच्छा भेट घेतली असल्याचे भाजप गटनेते तथा नगरसेवक वरुण पाटील यांनी सांगितले.

यावेळी अग्निशमन दलाच्या काही कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर गेली 30 ते 35 वर्षे आम्हाला भेटायला कोणी आले नाही. भाजप नगरसेवक तथा गटनेते यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त याठिकाणी भेट दिली त्याबाबत आभार मानले. यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड, नामदेव चौधरी, भाजपा पदाधिकारी प्रिया शर्मा, प्रताप टूमकर, कैलास पाटील, महेश पाटील आदीसह अग्निशमन दलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.