धुळे। नळाचे पाणी प्रभागात सोडले का जात नाही असा जाब विचारणार्या एकाने नगरसेवक चंद्रकात केले यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याची घटना शुक्रवार 24 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवपूरमधील मुक्ताईनगर भागात नगरसेवक चंद्रकांत केले यांच्या प्रभाग कार्यालयात सुशांत गोंविद झेंडे उर्फ बाबा झेंडे या व्यक्तीने आमच्या भागात पिण्याचे पाणी सोडले जात नाही या कारणावरून नगरसेवक चंद्रकांत केले यांना शिवीगाळ करीत कार्यालयातील खुर्च्या व खिडकीच्या काचा फोडल्या. याप्रकरणी हर्षल तुकाराम जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित सुशांत झेंडे याच्या विरोधात देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एएसआय पाटील करीत आहेत.