नगरसेवकाला मारहाणप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा

0

शिरुर: शहरात नगरसेवकाच्या वाढदिवसाला विरोध करून त्याला मारहाण व जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिरुरमधील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शिरुर नगरपालिकेचे नगरसेवक विनोद प्रकाश भालेराव (वय 31,रा.सैनिक सोसायटी) यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. भालेराव यांचा रविवारी (दि.30) वाढदिवस होता. नुकत्याच झालेल्या शिरुर नगरपालिकेच्या निवडणुकीत भालेराव हे वॉर्ड क्रमांक 8मधून निवडून आले आहेत. येथील नागरिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भालेराव व त्यांचे सहकारी उपस्थित असताना सतीश घोलप, आकाश पवार, महेश गायकवाड व इतर दोघांनी घोलप व भालेराव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी भालेराव यांची सासू भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता, त्यांनाही आरोपींनी धक्काबुक्की केली. यावेळी पवार याने सुरा घेऊन भालेराव यांना मारण्याचा प्रयत्न केला. मुख्य आरोपी सतीश घोलप याचेविरुद्ध पूर्वीचे तीन गुन्हे दाखल असून जानेवारी 2017मध्ये तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून तो प्रलंबित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी शिरुर पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे हे करत आहेत.