नगरसेवकाला राहिले नाही कोरोनाचे भान: केली जंगी पार्टी

0

नंदुरबार: कोरोना संकट काळात शहरातील एका नगरसेवकाने दिलेल्या कथित व्हीआयपी पार्टीची तक्रार थेट मंत्रालयापर्यंत करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे जिल्हा प्रशासनाने देखील या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे समजते. या पार्टीत जेवण बनविणारा आचारीच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने या पार्टीत सहभागी झालेले बडे अधिकारी , राजकीय पुढारी यांच्या मानगुटीवर कोरोनाचे भूत थयथयाट करू लागले आहे, तथापि अनेक जणांनी तो मी नव्हेच अशी भूमिका घेत स्वतःला होम कोरोंटाईन करून घेतले असण्याची शक्यता आहे.
या बाबत भाजपाने देखील जिल्हाअधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार शहरातील एका बड्या राजकीय नेत्याचा खास विश्वासू आणि पोलीस खात्यात चांगलीच उठबस असलेल्या एका नगरसेवकाच्या मुलाचे नुकतेच लग्न झाले. कोरोना प्रसार होऊ नये म्हणून शासनाने सामूहिक कार्यक्रमांना बंदी घातलेली असतानासुद्धा या नगरसेवकाने मात्र एका बड्या राजकीय नेत्याच्या फार्महाऊसवर गपचूपपणे चक्क लॉकडाऊन कालावधीत नियमांची पायमल्ली करीत जंगी पार्टी दिल्याचे बोलले जात आहे. परिणामी या प्रकाराने नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने बजावलेल्या कामगिरीवर पाणी फिरून कोरोनाचा शहरात मोठा विस्फोट होण्याची दाट शक्यता बनली आहे. तरी तातडीने त्या सर्व संशयीतांना क्वारंटाईन करणे नितांत आवश्यक आहे.
तसेच ज्यांनी कायदे नियम पाळायचे तेच अधिकारी अशा गोष्टीत सामील कसे झाले? सामान्य माणसाने तोंडाला रुमाल बांधला नाही म्हणून दंड वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांनी उघडपणे लॉक डाऊनचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या नगरसेवकावर जागीच कारवाई का केली नाही? असे प्रश्न चर्चेत येऊन आपल्या स्वच्छ कर्तव्यदक्ष कारभारावर डाग ऊमटवला जात आहे. पार्टीचे आयोजन करून संचार बंदीचे उल्लंघन करण्यात आले व उपस्थित अधिकाऱ्यांचे हे वर्तन बेजबाबदारीचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने याची दखल घेऊन आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन झाले किंवा कसे याची व त्या कथित पार्टीला उपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
——